नागपूर विभागात सहा महिन्यात २५८ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:07 PM2018-01-22T12:07:31+5:302018-01-22T12:09:52+5:30

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या २५८ जणांची नोंद झाली आहे.

In the Nagpur division, 258 people have attempted suicide in six months | नागपूर विभागात सहा महिन्यात २५८ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर विभागात सहा महिन्यात २५८ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देआयुष्याला कंटाळल्या होत्या १२७ महिलामनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमाची आकडेवारी

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाणही वाढत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या २५८ जणांची नोंद झाली आहे. यात पुरुषांची संख्या मोठी आहे. त्याच्या खालोखाल महिला, विद्यार्थी आणि शेतकरी आहेत.
नैराश्यातून आत्महत्येकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतात आठ व्यक्तींमागे एकजण नैराश्यग्रस्त आहे. एका अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यामधील ४० टक्के पुरुष व ६० टक्के महिला आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या कितीतरी जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, वेळीच उपचाराला सुरुवात केल्यास नैराश्य ते आत्महत्या हा प्रवास टाळता येऊ शकतो. याच उद्देशाने प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले आहे. या कार्यक्रमातून रुग्णांना उपचारखाली आणून त्यांना नवे आयुष्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

घरगुती भांडणामधून आत्महत्येचा प्रयत्न अधिक
आत्महत्येचा प्रयत्न किंवा त्या संदर्भातील विचार मनात घोळत राहण्यासाठी घरगुती भांडण हे मुख्य कारण आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आकडेवारीनुसार या कारणाला ४५ टक्के रुग्ण कारणीभूत आहे. त्यानंतर वित्तीय हानीच्या कारणासाठी ३० टक्के, दुर्धर आजारासाठी २० टक्के, जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे ३ टक्के तर परीक्षेत नापास झाल्याच्या कारणामुळे २ टक्के रुग्णांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

१३१ पुरुष होते आत्महत्येच्या उंबरठ्यावर
कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. याला सर्वात जास्त पुरुष बळी पडत आहे. परिणामी आत्महत्येचे विचार वाढत आहेत. २०१२ मध्ये ४५२, २०१३ मध्ये २५५, २०१४ मध्ये ३५५ तर २०१५ मध्ये ४६० २०१६ मध्ये १३५ तर आॅक्टोबर २०१७ पर्यंत १३१ पुरुषांनी आत्महत्येचा प्रयत्न किंवा विचार केला आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी
प्रादेशिक मनोरुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत १३१ पुरुषांनी तर १२७ महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न किंवा विचार केला. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या किंचित कमी असली तरी मागील पाच वर्षांच्या आकडेवारीत आत्महत्येचा प्रयत्न करणाºयांमध्ये महिलांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

१२ ते ३० वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या
मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढतच आहे. यात १२ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मनोरुग्णालयात गेल्या सहा महिन्यात १० विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रुग्णालयाच्या मनोचिकित्सकानुसार, पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे, ते जाणून घ्यायला हवे. त्यांच्याशी संवाद साधायला हवा.

प्रत्येक रुग्णांची वेगळी फाईल
बदलत्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत आहेत. यांच्यावर वेळीच उपचार झाल्यास हे रुग्ण पूर्णत: बरे होतात. रुग्णालय प्रशासनाने अशा रुग्णांवर प्रभावी उपचारासाठी प्रत्येकाची स्वतंत्र फाईल तयार केली जात असून, त्याचा पाठपुरावाही केला जात आहे.
-डॉ. प्रवीण नवखरे, वैद्यकीय उपअधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

Web Title: In the Nagpur division, 258 people have attempted suicide in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.