मध्य रेल्वेच्या विकास कामात सर्वाधिक योगदान नागपूर विभागाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 11:13 PM2022-11-25T23:13:07+5:302022-11-25T23:48:08+5:30
महाव्यवस्थापक लाहोटी यांच्याकडून काैतूक : इटारसी-बैतुल-आमला-परासिया विभागाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुप्रतिक्षीत अजनी वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन आणि नागपूर रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार आहे. अजनीच्या २९८ कोटींच्या कामाचे टेंडर २१ नोव्हेंबरला की स्टोन आणि ग्लोब सिव्हील या दोन कंपन्यांना संयुक्तपणे देण्यात आले आहे. नागपूर स्टेशनचे ४८८ कोटींच्या कामाचे टेंडरही रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए)ने दिल्लीच्या गिरधारीलाल कन्स्ट्रक्शन कंपनीला जारी केले आहे. या दोन्ही स्थानकांचे कंत्राट आरएलडीए बघणार असून मध्य रेल्वे विकास कामासाठी आवश्यक जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या कामाला समांतर नागपूर आणि अजनीत यार्ड रिमॉडेलिंग वर्कसुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी आज येथे दिली.
लाहोटी शुक्रवारी नागपूर रेल्वे विभागात निरीक्षण दाैऱ्यावर आले होते. त्यांनी आपल्या दाैऱ्यात इटारसी-बैतुल-आमला-परासिया रेल्वे विभागाची पाहणी आणि तपासणी केली. हे करतानाच या विभागात नेमकी कोणती समस्या आहे, त्याचीही माहिती जाणून घेतली. त्यानंतर रात्री त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ आयुक्त आशुतोष पांडे तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्याच्या कालावधीत मध्य रेल्वेत १७० किलोमिटर रेल्वे लाईनचे दुहेरीकरण, ८६ किलोमिटर मेनलाईन आणि ५५ किलोमिटरच्या साईड लाईनचे विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. या शिवायही अनेक विकासकामे करण्यात आली. या विकास कामात सर्वाधिक योगदान नागपूर विभागाने दिल्याची माहिती देऊन महाव्यवस्थापक लाहोटी यांनी नागपूर विभागातील रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काैतुक केले.
लाहोटी यांनी सहेलि आणि काळा आखर स्थानकांदरम्यान असलेल्या सहेलि पुलाची पाहणी करून तपासणी दाैऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर काळा आखर- घोराडोंग्री मार्गावर त्यांची गाडी ताशी १३० किलोमिटर वेगाने धावली. घोराडोंग्री स्थानकावर, महाव्यवस्थापकांनी परिभ्रमण क्षेत्र, पॅनेल/रिले कक्ष, सोलर प्लांट, रेल्वे कॉलनी आणि उद्यानाची आणि लेव्हल क्रॉसिंग गेटची पाहणी केली, धराखोह येथील कॅच साईडिंग तपासणी केल्यानंतर बोगदा, व्हायाडक्टची पाहणी केली आणि धाराखोह-मरामझिरी विभागावरील ट्रॅक मेंटेनरच्या गँग युनिटशी संवाद साधला. आमला येथे अपघात निवारण ट्रेन आणि अपघात निवारण वैद्यकीय उपकरणांची पाहणी केली, त्यानंतर आमला-बोर्डाई सेक्शनवर धावण्याचा वेग आणि नवेगाव ते हिरडागड दरम्यान वक्रची तपासणी केली. जुन्नारदेव स्थानकावर परिभ्रमण क्षेत्र, पॅनेल कक्ष, प्रतीक्षा कक्ष आणि क्रू लॉबी, आरपीएफ कार्यालय आणि आरोग्य युनिटची पाहणी केली.
लाहोटी म्हणाले...!
पत्रकारांशी संवाद साधताना लाहोटी म्हणाले, ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रोजेक्टचा प्रस्ताव महामेट्रोने रेल्वे बोर्डाला दिला आहे. वरिष्ठ पातळीवर या संबंधाने जो निर्णय घेतला जाईल त्याला अनुसरून मध्य रेेल्वे आवश्यक भूमीका घेईल, असे त्यांनी म्हटले.
एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने ४४ मेट्रीक टन मालाची वाहतूक केली. याच कालावधीत विनातिकिट तसेच अवैध प्रवास करणाऱ्या २९ लाख प्रवाशांवर कारवाई करून १९४ कोटींची रक्कम वसुल करण्यात आली. गेल्या वर्षी ही रोकड ९३ कोटी होती. बैतूलच्या गुडस् शेडमुळे तेथील नागरिकांना अडचण होत असल्याचे आजच्या पाहणीतून लक्षात आले. त्यामुळे हे शेड बरामझरीला स्थानांतरीत करण्यात येणार असल्याचेही लाहोटी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.