नागपूर विभाग : २० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:30 AM2020-04-18T00:30:47+5:302020-04-18T00:32:17+5:30
२० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार असून खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी शुक्रवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या ‘लॉकडाऊन’ची परिस्थिती असली तरी शेतीच्या खरीप हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. विभागात सरासरी खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार असून खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी शुक्रवारी दिली.
खरीप हंगामासाठी कापूस सोयाबीन तूर, भात आदी पिकांचे नियोजन कृषी विभागतर्फे जिल्हानिहाय करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे मागणीनुसार कृषीसेवा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कृषी विभागातर्फे तालुका तसेच मंडळस्तरावर गावनिहाय खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या बियाणे व खतांच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामातील विविध पिकानुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस पिकासाठी विभागात ६ लाख ७२ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून सोयाबीन पिकांतर्गत सरासरी ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच तूर पिकांतर्गत १ लाख ९४ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे.
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात भात पिकांची प्रामुख्याने लागवड होत असल्यामुळे या पिकांतर्गत खरीप हंगामात ७ लाख ८९ हजार १७४ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागातर्फे खरीप हंगामातील पिकांच्या बियाण्यांचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले आहे.