नागपूर विभागात कॉपीचे प्रमाण घटले
By admin | Published: June 14, 2017 01:15 AM2017-06-14T01:15:32+5:302017-06-14T01:15:32+5:30
गेल्या सहा वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे.
८७ कॉपीबहाद्दर दोषी : गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या सहा वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदादेखील शालांत परीक्षेत कॉपीला आळा बसल्याचे आढळून आले. नागपूर विभागामध्ये कॉपीची एकूण ८७ प्रकरणे आढळली असून यामध्ये सर्व विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी दोषींचा आकडा ११४ इतका होता.
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ३२ कॉपीबहाद्दर दोषी आढळले. विशेषत: कॉपीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात १८ प्रकरणे आढळून आली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी दोन कॉपीबहाद्दर सापडले.
विभागात कॉपीची संख्या दरवर्षी कमी होत आहे. कॉपीमुक्त अभियानावर आमचा जास्तीत जास्त भर आहे, अशी माहिती विभागीय मंडळ अध्यक्ष संजय गणोरकर यांनी दिली.
परीक्षा झाल्यानंतर आढळली ४७ प्रकरणे
दरम्यान, परीक्षा झाल्यानंतरच्या काळात गैरमार्गाचा अनेकांकडून अवलंब करण्यात येतो. विभागात अशी ४७ प्रकरणे आढळली व यातील सात जण दोषी ठरले. ३७ जणांना निर्दोष सोडण्यात आले तर तीन विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.