मालवाहतुकीत मध्य रेल्वेचा नागपूर विभाग देशात आठव्या स्थानावर

By नरेश डोंगरे | Published: April 1, 2024 10:25 PM2024-04-01T22:25:38+5:302024-04-01T22:25:47+5:30

५३२८.८७ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई : रेल्वे बोर्डाकडून दखल

Nagpur division of Central Railway ranks 8th in the country in terms of freight traffic | मालवाहतुकीत मध्य रेल्वेचा नागपूर विभाग देशात आठव्या स्थानावर

मालवाहतुकीत मध्य रेल्वेचा नागपूर विभाग देशात आठव्या स्थानावर

नागपूर: कमाईचा रेकॉर्ड करून मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने मालवाहतुकीत देशाच्या इतर रेल्वे विभागांना मागे टाकत आठवे स्थान गाठले आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षांत वेगवेगळ्या मालाची, साहित्याची वाहतूक करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ५३२८.८७ कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली, हे उल्लेखनीय!

रेल्वे बोर्डाने देशातील वेगवेगळ्या ७१ विभागांच्या या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीची कामगिरी प्रकाशित केली आहे. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या रेकॉर्डब्रेक कामगिरीचा प्रशंसनीय आलेख नोंदविण्यात आला आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षांत नागपूर विभागाने ५०.०६ दशलक्ष टन (एमटी) मालाची वाहतूक केली आहे. गेल्या वर्षीचा आकडा ४४.४० एमटी होता. अर्थात यावर्षी त्यात १२.७७ टक्क्यांची भर पडली आहे. यातून गेल्या वर्षी ४५९४.१६ कोटींची कमाई केली होती. तर यावर्षी ५३२८.६७ कोटींची कमाई केली आहे. २०२४ च्या एकट्या मार्च महिन्यात नागपूर विभागाने १३२६ रॅक लोड करून चक्क ५०७.२४ कोटींची कमाई केली. रेल्वे बोर्डाकडून नागपूर विभागाच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली असून राष्ट्रीय मालवाहतूक घडामोडीत या प्रशंसनीय योगदानाची नोंद करण्यात आली आहे.

वेगवेगळे उपक्रम, विभागातील प्रत्येकाचे समर्पण
गेल्या काही महिन्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला वेगवेगळ्या साधन, सुविधांची जोड देऊन अपडेट करण्यात आले आहे. मालवाहतुकीतून जास्तीतजास्त उत्पन्न मिळावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्या संबंधाने या विभागातील प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्याला प्रोत्साहित केले जात आहे. त्यांच्या परिश्रमामुळेच नागपूर विभागाला हे उल्लेखनीय यश मिळवता आले असल्याची प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) मनीष अग्रवाल यांनी दिली आहे.

 

Web Title: Nagpur division of Central Railway ranks 8th in the country in terms of freight traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.