बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, पण राज्यात आठव्या क्रमांकावर
By आनंद डेकाटे | Published: May 21, 2024 03:58 PM2024-05-21T15:58:34+5:302024-05-21T15:59:08+5:30
नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के मागच्या वर्षीच्या तुलनेत १.७७ टक्के वाढ : विभागात गोंदिया जिल्हा अव्वल, वर्धा सर्वात कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १.७७ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. परंतु, राज्यात नागपूर विभाग आठव्या क्रमांकावरच आहे. नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्हा ९५.२४ टक्क्यांनी अव्वल ठरला आहे. तर वर्धा जिल्ह्याचा निकाल ८९.४० टक्यांसह सर्वात कमी आहे.
करोना काळात मिळालेले गृह परीक्षा केंद्र, कमी अभ्यासक्रम आणि अतिरिक्त वेळ या सवलतींचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी दोन वर्षे शिक्षण मंडळाच्या मागील वर्षीच्या निकालात भरारी घेतली होती. यामुळे नागपूर विभागाच्या निकालातही वाढ झाली होती. मात्र, सवलती बंद होताच नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी कमी झाली हाेती. यंदा विभागाने काहीशी कामगिरी सुधारली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नागपूर विभागाचा निकाल ९०.३५ टक्के होता. यात आता १.७७ टक्के वाढ होऊन ९२.१२ झाला आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये विभागातून १ लाख ५६ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ५५ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४३ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.१२ इतकी आहे. करोना काळात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, दोन वर्षांपासून या सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.०८ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ८६.११ टक्के लागला आहे.
यंदाही मुलीच अव्वल
मंगळवारी दुपारी १ वाजता राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे. नागपूर विभागाच्या निकालात मुलांची टक्केवारी – ८९.८५ टक्के तर मुलींची टक्केवारी ९४.४६ इतकी आहे.
विभागातील स्थिती
एकूण नोंदणी- १,५६,३४२
परीक्षा देणारे विद्यार्थी- १,५५,३७४
उत्तीर्ण विद्यार्थी – १,४३,१३१
एकूण टक्केवारी – ९२.१२ -
विभागातील जिल्हानिहाय टक्केवारी
गोंदिया - ९५.२४ टक्के
भंडारा - ९४.६८ टक्के
गडचिरोली - ९४.४२ टक्के
चंद्रपूर - ९३.८९ टक्के
नागपूर - ८९.९३ टक्के
वर्धा - ८९.४० टक्के
एकूण - ९२.१२ टक्के
शाखानिहाय निकाल
विज्ञान- ९७.०८
वाणिज्य – ८७.२८
कला – ८६.११
एमसीव्हीसी – ८७.६१
आयटी – ८०.९७