Nagpur Teachers Constituency : गुरुजींचे आज मतदान, कुणाला करणार आमदार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:35 AM2023-01-30T10:35:23+5:302023-01-30T10:37:54+5:30

गाणार, अडबाले, झाडे यांच्यात टक्कर : वंचितचे खोब्रागडे, ‘आप’चे वानखेडे कुणाचे गणित बिघडवणार?

Nagpur Division Teachers Constituency Election Today; Collision between Nago Ganaar, Sudakar Adbale, Rajendra Zade | Nagpur Teachers Constituency : गुरुजींचे आज मतदान, कुणाला करणार आमदार?

Nagpur Teachers Constituency : गुरुजींचे आज मतदान, कुणाला करणार आमदार?

googlenewsNext

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे. विभागातील ३९ हजार ४०६ गुरुजी मतदान करून आपला आमदार निवडतील. भाजपपुरस्कृत शिक्षक परिषदेचे नागो गाणार, महाविकास आघाडीप्रणित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. वंचित बहुजन आघाडीचे दीपककुमार खोब्रागडे व आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे हे किती मते घेऊन कुणाचे गणित बिघडवतात, याकडे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघात एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. गडचिरोली वगळता विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होईल. तर गडचिरोली जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत मतदान होईल. २ फेब्रुवारी रोजी अजनी येथील सामुदायिक भवन येथे मतमोजणी होईल. या निवडणुकीत उमेदवाराला पाठिंबा जाहीर करताना भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा चांगलाच कस लागला.

भाजपमध्ये बराच खल झाल्यानंतर अखेरच्या क्षणी नागो गाणार यांना पाठिंबा देण्यात आला. तर अडबाले की झाडे हे कोडे सोडवण्यात काँग्रेसची मोठी गोची झाली. सुरुवातील ही जागा शिवसेनेच्या कोट्यात सोडण्यात आली. स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या विरोधानंतर जागा परत मिळाली व शेवटी अडबाले यांना समर्थन जाहीर करण्यात आले. पदवीधर निवडणुकीत झाडे यांना दिलेला शब्द काँग्रेस नेत्यांनी पाळला नाही. शेवटी झाडे शिक्षक भारतीकडून रिंगणात उतरले. भाजप- काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक चांगलीच मनावर घेतली व जोरात प्रचार केला. झाडे यांच्यासाठी त्यांची संघटनाही राबली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दीपककुमार खोब्रागडे यांच्यासाठी नागपुरात घेत बैठका घेतल्या. तर देवेंद्र वानखेडे यांच्यासाठी आम आदमी पक्षाच्या कॅडरने शाळा पिंजून काढल्या. सर्वांनीच जोर लावल्यामुळे ही निवडणूक अधिक काट्याची व रंगतदार झाल्याचे चित्र आहे.

- नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये १२४ मतदान केंद्रांवर मतदान होईल. नागपूर जिल्ह्यात ४३, वर्धा जिल्ह्यात १४, भंडारा १२, गोंदिया १०, चंद्रपूर २७ व गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

- रविवारी दुपारी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातून मतदान पथके रवाना करण्यात आली. नागपूर ४३, भंडारा १२, गोंदिया १०, वर्धा १४, चंद्रपूर २७ व गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान पथके रवाना झाली.

- अजनी रेल्वेस्थानकाजवळील सामुदायिक भवन या ठिकाणी सुरक्षा भवन (स्ट्राँग रूम) उभारण्यात आले असून, मतदानानंतर मतपेट्या या ठिकाणी जमा होणार आहेत. २ फेब्रुवारीला याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

असे आहेत उमेदवार

नागो गाणार - भाजप

सुधाकर अडबाले - महाविकास आघाडी समर्थित (अपक्ष)

निमा रंगारी - बहुजन समाज पक्ष

प्रा. दीपकुमार खोब्रागडे - वंचित बहुजन आघाडी पक्ष

देवेंद्र वानखडे - आम आदमी पार्टी

राजेंद्र झाडे - समाजवादी पक्ष (युनायटेड)

सतीश जगताप - महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष

इंजिनीअर प्रो. सुषमा भड - अपक्ष

अजय भोयर - अपक्ष

सतीश इटकेलवार - अपक्ष

बाबाराव उरकुडे - अपक्ष

रामराव चव्हाण - अपक्ष

रवींद्रदादा डोंगरदेव - अपक्ष

नरेश पिल्ले - विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष

नरेंद्र पिपरे - अपक्ष

प्रा. प्रवीण गिरडकर - अपक्ष

राजेंद्र बागडे - अपक्ष

डॉ. विनोद राऊत - अपक्ष

उत्तमप्रकाश शहारे - अपक्ष

श्रीधर साळवे - अपक्ष

प्रा. सचिन काळबांडे - अपक्ष

संजय रंगारी - अपक्ष

असे आहेत जिल्हानिहाय मतदार

जिल्हा - मतदार

नागपूर - १६,४८०

चंद्रपूर - ७,५७१

वर्धा - ४,८९४

भंडारा - ३,७९७

गोंदिया - ३,८८१

गडचिरोली - ३,२११

Web Title: Nagpur Division Teachers Constituency Election Today; Collision between Nago Ganaar, Sudakar Adbale, Rajendra Zade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.