नागपूर विभागीय शिक्षण मंडळ झाले पांगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:36+5:302021-08-01T04:07:36+5:30
नागपूर : कोरोनाच्या काळात दहावी, बारावीच्या निकालाची कसरत यशस्वीरीत्या पार पाडण्यात नागपूर विभागाची भूमिका अव्वल ठरली. नागपूर विभागाला कायमस्वरूपी ...
नागपूर : कोरोनाच्या काळात दहावी, बारावीच्या निकालाची कसरत यशस्वीरीत्या पार पाडण्यात नागपूर विभागाची भूमिका अव्वल ठरली. नागपूर विभागाला कायमस्वरूपी अध्यक्ष आणि सचिव नसल्याने ही सर्व जबाबदारी सहसचिव असलेल्या माधुरी सावरकर यांनी पार पाडली. निकाल घोषित झाल्यानंतर शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सावरकर यांचीही बदली करण्यात आल्याने आता बोर्डाची कमान सांभाळणारे अधिकारीच नसल्याने बोर्ड पांगळे झाले आहे.
तसे २०१३ पासून नागपूर बोर्डाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. २०१६ मध्ये संजय गणोरकर यांच्याकडे अध्यक्षपद आले, पण त्यांच्याकडे इतर विभागाचाही प्रभार होता. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष अजूनही प्रभारीवरच आहेत. बोर्डाचे सचिव रविकांत देशपांडे हे २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार होता. रविकांत देशपांडे निवृत्त झाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे बोर्डाच्या अध्यक्षाचा अतिरिक्त चार्ज सोपविण्यात आला, तर सचिवाचा चार्ज सहसचिव माधुरी सावरकर यांच्याकडे देण्यात आला; पण २०२१ मध्ये पारधीही सेवानिवृत्त झाले. पुन्हा त्यांचा प्रभार शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्याकडे आला; पण सावरकर यांनी बोर्डाच्या कामकाजाची धुरा सांभाळली.
२०२०-२१ हे सत्र शिक्षण क्षेत्रासाठीच आव्हानात्मक होते. परीक्षा झाल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांचे निकाल लावायचे होते. शाळांकडून मूल्यांकनाचे काम करून घ्यायचे होते. अशात वेबसाइटच्या अडचणी भेडसावल्या. शिक्षकांचा संताप वाढला. निकालाच्या बाबतीत पालक विद्यार्थ्यांचा त्रागा झाला. शिक्षक संघटनांच्या निवेदनांचा खच बोर्डाकडे जमा झाला. या सर्व परिस्थितीवर मात करीत माधुरी सावरकर यांनी बोर्डाला सावरले; पण दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर त्यांचीही गोंदियाला शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली. आता बोर्डाची धुरा सांभाळणारे अधिकारी सध्यातरी नाहीत.
- श्रीराम चव्हाण यांना दिली कळमेश्वर बीईओची जबाबदारी
नागपूर बोर्डाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्रीराम चव्हाण यांची पदोन्नती झाली होती; परंतु नंतर शासनाने त्यांची पदोन्नती मागे घेतली. ते विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची कळमेश्वरला बीईओ म्हणून बदली करण्यात आली.