SSC Result: केतकी वानखेडे नागपुरातून टॉप; नागपूर विभागाचा निकाल सुधारला, राज्यात चौथ्या स्थानी; विद्यार्थिनींची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 04:38 PM2022-06-17T16:38:30+5:302022-06-17T21:00:03+5:30
Nagpur News मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा दहावी परीक्षेचा निकाल यंदा २.६२ टक्क्यांनी घटला असला तरी राज्यातील स्थान सुधारले आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा २.६२ टक्क्यांनी घटला असला तरी राज्यातील स्थान सुधारले आहे. राज्यात नागपूर विभाग चौथ्या स्थानी आहे. मागील वर्षी विभाग शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होता.
शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलच्या केतकी वानखेडे हिने ९९.८० टक्के गुणांसह नागपुरातून टॉप केला आहे. पं. बच्छराज व्यास विद्यालयाची विद्यार्थिनी प्राजक्ता भुडे व सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ येथील विद्यार्थिनी अंतरा कवठेकर या दोघी ९८.८० टक्के गुणांसह नागपुरातून दुसऱ्या आल्या आहेत. तर टाटा पारसी विद्यालयाची श्रावणी कुकडे, पं. बच्छराज व्यास विद्यालयाची अनन्या शेळके व सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ येथील वेदिका सुटे या ९८.६० टक्के गुण मिळत संयुक्तपणे तृतीय आल्या.
विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्णांमध्ये देखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७४ हजार ७५२ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यातील ७३ हजार ३९४ उत्तीर्ण झाल्या. त्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९८.१८ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९५.८८ टक्के इतके आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ४९ हजार ३३७ परीक्षार्थींनी यश संपादित केले.
विभागात नागपूर जिल्हा ‘टॉप’
नागपूर विभागात यंदा नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ५९ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५८ हजार १०१ म्हणजेच ९७.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भंडारा जिल्ह्यातून १६ हजार ७६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ हजार ३०९ म्हणजेच ९७.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे ९५.६२ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
भंडारा - ९७.२६ टक्के
चंद्रपूर - ९५.९७ टक्के
नागपूर - ९७.९३ टक्के
वर्धा - ९६.२४ टक्के
गडचिरोली - ९५.६२ टक्के
गोंदिया - ९७.०७ टक्के