नागपुरात कुत्र्याने डोके फोडलेल्या चिमुकलीचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:45 AM2018-09-30T00:45:40+5:302018-09-30T00:47:00+5:30
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. तर, दुसरीकडे अशा मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतलेल्यांंना मोफत उपचार देण्याचे सौजन्यही प्रशासन दाखवीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. शुक्रवारी पिसाळलेल्या कुत्र्याने चार वर्षीय चिमुकलीचे अक्षरश: डोके फोडले. तिला मेयोत दाखल केले. परंतु रुग्णालयात औषधे नसल्याने हातमजुरी करणाऱ्या तिच्या वडिलांनी ‘अॅण्टीरेबिज’ लसीसोबत इतर औषधे आणून दिल्यावरच उपचाराला सुरुवात झाली. या प्रकरणाला घेऊन मेयो प्रशासनालाच रेबीज झाल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. तर, दुसरीकडे अशा मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतलेल्यांंना मोफत उपचार देण्याचे सौजन्यही प्रशासन दाखवीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. शुक्रवारी पिसाळलेल्या कुत्र्याने चार वर्षीय चिमुकलीचे अक्षरश: डोके फोडले. तिला मेयोत दाखल केले. परंतु रुग्णालयात औषधे नसल्याने हातमजुरी करणाऱ्या तिच्या वडिलांनी ‘अॅण्टीरेबिज’ लसीसोबत इतर औषधे आणून दिल्यावरच उपचाराला सुरुवात झाली. या प्रकरणाला घेऊन मेयो प्रशासनालाच रेबीज झाल्याचे बोलले जात आहे.
शहरातील रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येतात. रात्रपाळी करून घरी परतणाºया नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. एकटी लहान मुले दिसली की तुटून पडतात. शुक्रवार सायंकाळी अशीच घटना घडली. तांडापेठ येथे चार वर्षीय चिमुकली त्रिशा काठीकर आपल्या घरासमोर खेळत होती. अचानक एका पिसाळलेल्या कुत्राने तिच्यावर उडी मारून डाव्या डोळ्याच्या वरील डोके जबड्यात पकडले. तिच्या आरडाओरडीने घरातील लोक बाहेर आले. त्रिशाला त्यास्थितीत पाहत अनेक जण घाबरले. हातात मिळेल त्या वस्तूने कुत्र्याला मारणे सुरू केले. परंतु कुत्रा त्रिशाला सोडायला तयार नव्हता. लोकांनी जेव्हा काठ्या मारायला सुरुवात केली तेव्हा कुठे कुत्र्याने त्रिशाला सोडले. कुत्र्याच्या चावाने त्रिशाचे डोके पूर्ण फाटले. रक्तस्रावही मोठ्या प्रमाणात होत होता. त्याच अवस्थेत तिला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी तातडीने तिच्यावर उपचार सुरू केले. परंतु रुग्णालयात औषधेच नसल्याने नाईलाजाने त्यांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले. त्रिशाचे वडील हातमजुरी करतात. त्यांच्याकडे ‘बीपीएल’चे कार्डही आहे. परंतु रात्रीची वेळ असल्याने कार्डाचा उपयोग झाला नाही. त्यांनी इतरांकडून उसणे पैसे घेत अॅन्टीरेबिज लसीसह इतरही औषधे विकत घेऊन डॉक्टरांना दिली. दुसºया दिवशी शनिवारीही त्यांना बाहेरून औषधे लिहून दिली. त्रिशाच्या नातेवाईकाने ‘लोकमत’ला फोन करून याविषयी माहिती दिली. ‘लोकमत प्रतिनिधी’ने संबंधित विभागाच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने रुग्णालयातून औषधे उपलब्ध करून देण्याचा सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या. तूर्तास त्रिशाची प्रकृती गंभीर आहे. जखम खोलवर असून तिथे टाकेही लावणे कठीण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बजेरिया चौक, मासोळी मार्केट आणि संत्रा मार्केटच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. मोटरसायकल आणि वाहनांच्या मागे कुत्री धावतात. यामुळे अपघातांच्या घटनाही वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, या भागातील लोक रात्री घराबाहेर पडण्यास भितात. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, कुत्र्यांच्या दहशतीची तक्रार वारंवार करूनही अद्यापही उपाययोजना करण्यात आली नाही.