चांगली बातमी! दाेन वर्षानंतर कतारसाठी नागपूर-दाेहा विमानसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 11:14 AM2022-06-02T11:14:40+5:302022-06-02T11:21:52+5:30
Nagpur News दोन वर्षांपूर्वी बंद झालेले कतार एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण १ जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी ही एकमात्र ‘फाईव्ह स्टार’ एअरलाईन्स आहे.
नागपूर : दाेन वर्षापूर्वी बंद करण्यात आलेली कतार एअरवेजची नागपूर-दाेहा विमानसेवा १ जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. लाॅकडाऊन आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर बंदी लागल्यानंतर ही फ्लाईट बंद करण्यात आली हाेती. ही विमानसेवा सुरू करावी म्हणून सातत्याने मागणी केली जात हाेती.
मार्च २०२२ मध्ये हे विमान पुन्हा सुरू करण्याची तयारी करण्यात आली. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजद्वारे यापूर्वी मे २०२२ मध्येच विमानसेवा सुरू करण्यात येणार हाेती. मात्र विमान कंपनीने काही तयारी केल्यानंतर ही सेवा जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. उल्लेखनीय म्हणजे लाेकमतने यापूर्वी २७ मार्चच्या अंकात ‘दाेहा विमान जूनपासून’ या शीर्षकासह वृत्त प्रकाशित केले हाेते. विशेष म्हणजे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित हाेणाऱ्या विमानांपैकी ही एकमेव फाईव्हस्टार एअरलाईन्स हाेती.
कतार नागपूर-दाेहासाठी एअरबस ३२० द्वारे विमानसेवा देत आली आहे. एकूण १४४ सीट असलेल्या या विमानात १२ बिझनेस क्लास आणि १३२ इकाॅनाॅमिक्स क्लासच्या सीट आहेत. यामध्ये मनाेरंजन आणि भाेजनाचीही व्यवस्था आहे. २८४० किलाेमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी विमानाला ४.३० तासांचा वेळ लागतो.
असे आहे फ्लाईट शेड्यूल
- फ्लाईट नंबर क्यूआर-०५९१, नागपुर-दोहा, डिपार्चर : ०३.४० वाजता (पहाटे), दोहा आगमन : ०५.०५ वाजता (स्थानिक वेळेनुसार), संचालन - सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार.
- क्यूआर ०५९१ दोहा-नागपुर, डिपार्चर : १९.४५ वाजता, नागपूर आगमन: रात्री ०१.५५ वाजता, संचालन : रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.