“पंतप्रधान मोदी आले, तर नक्कीच चहा द्यायला आवडेल”; ‘डॉली चहावाला’ सांगितली ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:25 PM2024-02-29T19:25:19+5:302024-02-29T19:25:46+5:30
Nagpur Dolly Chaiwala News: नेमका कोणाला चहा बनवून दिला याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण आता खूप अभिमान वाटतोय, असे ‘डॉली चहावाला’ने सांगितले.
Nagpur Dolly Chaiwala News: अब्जाधीश बिल गेट्स यांना वेगळ्या ओळखीची काहीच गरज नाही. सगळ्या सुखसुविधा पायाशी लोळण घेत असताना बिल गेट्स यांना चक्क नागपुरातील चहाविक्रेत्याच्या चहाने भुरळ घातली. बिल गेट्स यांनी चक्क त्या चहाविक्रेत्याला आमंत्रित करून डोळ्यासमोर चहा बनवताना पाहिले आणि चहा घेतला. तसेच त्याच्या कौशल्याबाबत कौतुकोद्गार काढले. खुद्द गेट्स यांनी ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, ‘डॉली चहावाला’ असे त्याचे नाव आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा द्यायला आवडेल, असे ‘डॉली चहावाला’ने म्हटले आहे.
बिल गेट्स यांच्या भेटीबाबत बोलताना ‘डॉली चहावाला’ने सांगितले की, मला अजिबातच हे माहिती नव्हते की, ते कोण आहेत. मला असे वाटले की, ते एक परदेशी व्यक्ती आहेत आणि एका परदेशी व्यक्तीला मी चहा देत आहे. मी नागपूरला परत आलो, तेव्हा मला समजले की, डॉलीने कोणाला चहा पाजला. त्यांनी खूपच छान प्रतिक्रिया दिली. त्यांचे आणि माझे काही बोलणे झाले नाही. मी फक्त चहा बनवण्याचे आणि त्यांना देण्याचे काम केले. दाक्षिणात्य चित्रपट पाहून, त्यांची कॉपी करून मी माझी स्टाइल बनवली आहे. त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचे पाहिले. मला याचा खूप आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने नागपूरचा ‘डॉली चहावाला’ झाल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया ‘डॉली चहावाला’याने दिली.
पंतप्रधान मोदी आले, तर नक्कीच चहा द्यायला आवडेल
बिल गेट्स यांना चहा बनवून दिल्यानंतर आता भविष्यात कोणाला चहा द्यायला आवडेल, असे ‘डॉली चहावाला’याला विचारण्यात आले. तेव्हा त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, तर त्यांना नक्कीच चहा बनवून द्यायला आवडेल, अशी इच्छा ‘डॉली चहावाला’ने व्यक्त केली. बिल गेट्स चहा घेणार आहेत, याची अजिबातच कल्पना नव्हती. त्यांच्या टीमच्या बोलावण्यावरून आम्ही तिथे गेलो होतो. आपण नेमका कोणाला चहा दिला, हे समजल्यावर मला आता खूप अभिमान वाटत आहे. दिवसभर हसतमुखाने चहा बनवावा आणि लोकांना द्यावा तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हसू अन् आनंद दिसावा, एवढीच इच्छा आहे. हसते रहो और हसाते रहो, असे ‘डॉली चहावाला’ने सांगितले.
दरम्यान, नागपुरातील ‘डॉली चहावाला’ हा मागील अनेक काळापासून ‘सोशल मीडिया’वर प्रसिद्ध आहे. त्याचे मोठे फॅन फॉलोईंग असून चहा बनविण्याच्या त्याच्या हटके स्टाइलमुळे त्याचे व्हिडिओ व रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गेट्स यांना सोशल माध्यमांतूनच त्याच्याबाबत कळाले व त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केले. डॉलीने तेथेच एका हात ठेल्यावर स्टोव्ह मांडून गेट्स यांच्या डोळ्यासमोर चहा तयार केला. गेट्स त्याची प्रत्येक लकब व चहा बनविण्याची स्टाईल कौतुकाने पाहत होते. व्हिडीओच्या सुरुवातीलाच गेट्स ‘वन चाय प्लिज’ असे म्हणताना दिसतात व व्हिडिओत भारतात परत आल्याने रोमांचित असल्याचे गेट्स यांनी नमूद केले आहे.