३१ ऑक्टोबरपासून नागपूर दूरदर्शनचे प्रसारण होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 08:05 AM2021-09-29T08:05:00+5:302021-09-29T08:05:01+5:30
Nagpur News नागपूर दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राची ही प्रसारण सेवा ३१ ऑक्टोबर २०२१च्या मध्यरात्रीपासून बंद केली जात आहे.
वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात १९८२ पासून सुरू असलेल्या दूरदर्शन केंद्रातून प्रसारण सेवा बंद होणार आहे. प्रसार भारती व दूरदर्शन महासंचालनालय, नवी दिल्लीच्या आदेशानुसार बॅण्ड ०३ चॅनल ०७ द्वारे आपले कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या नागपूर दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राची ही प्रसारण सेवा ३१ ऑक्टोबर २०२१च्या मध्यरात्रीपासून बंद केली जात आहे. आता हे प्रसारण टेरेस्ट्रियलच्या माध्यमातून उपलब्ध होणार नाही. (Nagpur Doordarshan will be closed from October 31)
पारंपरिक टेरेस्ट्रियल ट्रान्समिशन जुन्या ऐंटेनाद्वारे केले जात हाते. १३-१४ पाईप असलेला हा ऐंटेना अनेक वर्षापूर्वी घरोघरी छतावर दिसत होता. परंतु, डिजिटल टेक्नोलॉजीनंतर सॅटेलाईट बेस्ड चॅनल्सकडून प्रसारणाची ही जुनी सिस्टिम मागणे बंद होत गेले. त्यामुळेच, या आऊटडेटेड सिस्टिमला बंद केले जात आहे. आता नागपूर दूरदर्शनमध्ये केवळ पीजीएफ म्हणजेच स्टुडिओ असेल आणि येथून तयार होणारे कार्यक्रम मुंबई कार्यालयाकडे पाठविले जातील. तेथूनच या कार्यक्रमांचे प्रसारण होतील.
विशेष म्हणजे, १९८२ मध्ये जेव्हा टेरेस्ट्रियल ट्रान्समिशनची सुरुवात झाली तेव्हा कृषी क्षेत्राशी निगडित ‘आमची माती, आमची माणसं’सह अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच दूरदर्शनच्या सेवेचा एकाधिकार होता. सॅटेलाईट चॅनल्सच्या येण्यासोबतच ही सेवा मंदावली. दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी दूरदर्शनच्या डीडी फ्री डिश डीटीएच सर्व्हिसच्या माध्यमातून उपलब्ध आहे. हे सिग्नल मिळविण्यासाठी आवश्यक साधन जसे सेट टॉप बॉक्स, डिश ऐंटेना आणि अन्य सामग्री स्थानिक बाजारात उपलब्ध आहेत.
प्रसारण बंद, प्रॉडक्शन सुरू
प्रसार भारती आणि दूरदर्शन महासंचालनालयाच्या आदेशानुसार नागपूर दूरदर्शन केंद्राची प्रसारण सेवा बंद होत आहे. मात्र, येथील स्टुडिओमध्ये प्रॉडक्शन सुरू असेल. हे कार्यक्रम डीडी सह्याद्री, मुंबई येथून प्रसारित होतील.
- भूपेंद्र भागवत तुरकर, उपसंचालक, नागपूर दूरदर्शन
स्वीकृत कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल
नागपूर दूरदर्शन केंद्रात सद्यस्थितीत जवळपास ३५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. आधिकारिक सूत्रांनुसार आता नागपूर केंद्रातील स्वीकृत कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल. ट्रान्समिशनशी निगडित कर्मचारी आकाशवाणीच्या अन्य केंद्रांवर स्थानांतरित केले जाऊ शकतात.
...............