नागपूर दुर्गोत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:52 AM2017-09-26T00:52:24+5:302017-09-26T00:52:58+5:30
लक्ष्मीनगर येथे ‘लोकमत’ आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठ्या नागपूर दुर्गा महोत्सवाने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संगम साधला आहे. ज्या पद्धतीने हे आयोजन होत आहे,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लक्ष्मीनगर येथे ‘लोकमत’ आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठ्या नागपूर दुर्गा महोत्सवाने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संगम साधला आहे. ज्या पद्धतीने हे आयोजन होत आहे, त्यापासून इतर मंडळांनीदेखील आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक जाणीव लाभलेल्या नागपूर दुर्गोत्सवाने सर्वांना प्रेरणा दिली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
सोमवारी मुनगंटीवार, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने तसेच पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम् यांनी लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानावर सुरू असलेल्या नागपूर दुर्गा महोत्सवाला भेट दिली. सायंकाळी ७ च्या सुमारास मान्यवर दुर्गोत्सवात पोहोचले. मेट्रो रेल्वेच्या प्रतिकृतीने ते प्रभावित झाले. मुख्य मंडपात गेल्यानंतर ते माता दुर्गेसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी ‘क्रांतिकारी गॅलरी’ला भेट दिली. या गॅलरीत त्यांनी बराच वेळ क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे व एकूण आयोजनाबाबत माहिती घेतली. कृपाल तुमाने तसेच के. व्यंकटेशम् यांनीदेखील आयोजनाचे भरभरून कौतुक केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्ना मोहिले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
शाळांमध्ये पोहोचला पाहिजे जाज्वल्य इतिहास
शक्तीचा उत्सव साजरा होत असताना दुर्गोत्सवाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पोहोचतो आहे, ही फार गौरवशाली बाब आहे. शाळांपर्यंत हा इतिहास पोहोचविण्याची आवश्यकता आहे. यासाठी मंडळाने तसेच ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा. राज्य शासन यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असे मुनगंटीवार यांनी यावेळी आश्वासन दिले.
पहाटे ३.४५पर्यंत गर्दी
दरम्यान, रविवारी नागपूर दुर्गोत्सवाला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. रविवारी दिवसभर गर्दी होतीच. मात्र रात्रीच्या सुमारास आणखी गर्दी वाढली. अगदी पहाटे ३.४५पर्यंत दर्शन घेणाºयांची रीघ होती. दिवसभरात सुमारे एक लाख नागरिकांनी दुर्गोत्सवाला भेट दिली. विशेष म्हणजे भेट देणाºयांमध्ये विदर्भासोबतच खान्देश, मराठवाडा, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील भाविकांचा समावेश होता. सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती व राज्याबाहेरील नागरिकांचीदेखील रीघ दिसून आली.
आज दुर्गोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम
नागपूर दुर्गोत्सवात मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल.