नागपूर निवडणूक निकाल; उपराजधानीत भाजपला धक्के का बसले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:03 AM2019-10-25T10:03:09+5:302019-10-25T10:08:04+5:30
नागपूर शहरातील दोन मतदारसंघातील पराभवाबाबत स्वतंत्रपणे कारणमीमांसा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील नागपूरचेच. मागील पाच वर्षांत या दोन्ही नेत्यांनी नागपूर शहर व जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास केला. तरीही नागपूर शहर आणि जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी भाजपला दारुण पराभव का पत्करावा लागला, हा प्रश्न राजकीय वर्तुळात आज दिवसभर चर्चिल्या जात होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शेवटच्या क्षणी कामठी येथून उमेदवारी नाकारण्यात आल्याने जिल्ह्यातील चार मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला, हे एवढेच कारण पुरेसे नाही. नागपूर शहरातील दोन मतदारसंघातील पराभवाबाबत स्वतंत्रपणे कारणमीमांसा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघातून निवडून आले. महाराष्ट्रात तब्बल १०० जाहीर सभा व संपूर्ण प्रचाराची धुरा एकहाती सांभाळून मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मताधिक्याने येथे विजय मिळविला. परंतु मुख्यमंत्री या नात्याने एक लाखाहून अधिकच्या मताधिक्याने विजयी करण्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. या मतदारसंघातून २० हून अधिक नगरसेवक आहेत. असे असतानादेखील येथे केवळ ४९.८७ टक्के मतदान झाले. आपला नेता संपूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहे. अशा वेळी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे, हे इथल्या नगरसेवकांचे कर्तव्य होते. परंतु दोन ते तीन ज्येष्ठ नगरसेवक वगळता इतरांनी फक्त गप्पाच मारण्याचे काम केले.
पश्चिम नागपूर
येथून विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांना परत उमेदवारी देऊ नये, अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. परंतु देशमुखांचे तिकीट कापले तर बंडाळी होईल, या भीतीने त्यांनाच तिसऱ्यांदा मैदानात उतरविण्यात आले. त्यांची १० वर्षांतील निष्क्रियता हाच काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा होता. याअगोदर दोनदा पराभूत झाल्याने ठाकरे यांच्याबद्दल मतदारांना सहानभूतीदेखील होती. कार्यकर्त्यांशी संपर्क व लोकांच्या अडचणीत मदतीला धावून जाणे यामुळे ठाकरे यांचा विजय सोपी झाला. खरे तर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात नितीन गडकरींना मतांची मोठी आघाडी घेता आली नाही. त्याच वेळी भाजपने सावध होणे गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेलादेखील या मतदारसंघात थंड प्रतिसाद मिळाला होता. कार्यकर्त्यांची साथ न लाभल्यामुळे आणि ‘माझी ही शेवटची निवडणूक आहे’, असे सांगणाऱ्या देशमुखांवर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यामुळे विकास ठाकरे यांचा विजय झाला.
दक्षिण नागपूर
भाजपचे विजयी उमेदवार मोहन मते यांना काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत दिली. या मतदारसंघातील विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापल्यानंतर कोहळे गटाने बराच थयथयाट केला. नंतर कोहळेंची समजूत घातल्याने ते मते यांच्या समर्थनार्थ सभांमध्ये दिसले. परंतु त्यांचे समर्थक मात्र अलिप्त राहिले. मोहन मते यांनी माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत केलेला दांडगा जनसंपर्क त्यांच्या कामी आला. त्यांच्या वैयक्तिक संपर्कामुळे त्यांना येथे निसटता का होईना विजय मिळाला, अन्यथा भाजपच्याच काही लोकांनी त्यांचा ‘गेम’ करण्याचे ठरविले होते. फडणवीस, गडकरी यांनी या मतदारसंघात वैयक्तिक लक्ष घातले नसते तर मतेंच्या बाबतीत धोका झाला नसता.
पूर्व नागपूर
सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या कृष्णा खोपडे यांना मोठे मताधिक्य मिळेल असाच अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनादेखील कुणी गांभीर्याने घेतले नाही. खोपडे चांगल्या मतांनी निवडून आले असले तरी लोकसभेत नितीन गडकरी यांना मिळालेल्या सर्वाधिक मताधिक्याचा परिणाम कायम ठेवण्यात खोपडे यांना अपयश आले. सामान्यातील सामान्य मनुष्यासमवेत नाळ तुटू न देणे हे खोपडे यांच्या विजयाचे गमक ठरले.
मध्य नागपूर
भाजपचे विजयी उमेदवार विकास कुंभारे यांना काँग्रेसचे तरुण नगरसेवक बंटी शेळके यांनी दिलेली लढत कौतुकास्पद ठरली. शेळके इतकी मते घेतील असे कुणालाच वाटले नव्हते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या जागेवर गांभीर्याने लक्ष घातले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. विकास कुंभारे हे फार सक्रिय व सक्षम आमदार म्हणून ओळखले जात नाही. ‘माझ्याकडे यावेळी लढायला पैसे नाहीत, त्यामुळे मी लढत नाही. कुणालाही तिकीट द्या’, असे म्हणून भाजपच्या धंतोली कार्यालयातून रागाने निघून गेलेल्या कुंभारेंना उमेदवारी देणे व निवडून आणणे ही भाजपची मजबूरी होती. त्यादृष्टीने कुंभारे हे नशीबवान निघाले.
उत्तर नागपूर
भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. मिलिंद माने यांना यावेळी पुन्हा तिकीट मिळेल, असे वाटलेही नव्हते. परंतु भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात त्यांचेच नाव पुढे आल्याने त्यांना उमेदवारी देण्यावाचून गत्यंतर नव्हते. २०१४ मध्ये बहुजन समाज पक्षाचे किशोर गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने काँग्रेसचे नितीन राऊत यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र बसपाचा हत्ती चालला नाही. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली नाही. एरवी दिल्लीत जाऊन राऊतांच्या तक्रारी करणारे काँग्रेस कार्यकर्तेदेखील एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे राऊत मोठ्या आघाडीने विजयी झाले.