सभापतिपदासाठी आज निवडणूक; नाव अद्यापही गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 10:30 AM2022-11-01T10:30:55+5:302022-11-01T10:31:41+5:30
रामटेक, काटोल, कामठी, उमरेड विधानसभेतून येणार ‘सभापती’
नागपूर :जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची निवड विधानसभा मतदारसंघनिहाय काँग्रेस करणार असल्याची चर्चा आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत सावनेर व हिंगणा विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यामुळे कामठी, काटोल, रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्रातील जि. प.चे सदस्य सभापती बनतील, अशी दाट शक्यता आहे. आज, मंगळवारी सभापतिपदासाठी निवडणूक होणार असून, सभापतिपदासाठीची नावे अजूनही गुलदस्त्यातच आहेत.
पण हिंगणा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या एका गटाकडून एका सभापतीसाठी दावा करण्यात येत आहे, तर दुसऱ्या गटाकडून काटोल विधानसभेतून सभापतीसाठी आग्रह धरला जात आहे. कामठी मतदारसंघातून अवंतिका लेकुरवाळे, दिनेश ढोले यांच्या नावाची चर्चा आहे; पण अवंतिका लेकुरवाळे या सत्ता पक्षनेत्या आहेत. रामटेक मतदारसंघात दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांची नावे चर्चेत आहेत. कुमरेंचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्या नाराज झाल्यामुळे त्यांना एका समितीवर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते; पण पुरुष सदस्यांकडून तीन पुरुष व तीन महिला सदस्यांची निवड करण्याची मागणी होत आहे. फक्त महिला व बाल कल्याण समितीला महिला द्या, उर्वरित तीन ठिकाणी पुरुष सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. उमरेडमधून अरुण हटवार व मिलिंद सुटे यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय संजय जगताप, सुनीता ठाकरे, योगेश देशमुख हेही पदासाठी इच्छुक आहेत.
यंदा भाजप करणार काय?
अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बंडखोर उमेदवाराला समर्थन दिले होते; पण आता सर्व बंडखोर सदस्यांची घरवापसी केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांचा आहे. नाना कंभाले यांनीही फार्म हाऊसवर जाऊन सदस्यांशी भेट घेतली. मात्र, निवडणुकीच्या दिवशी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कंभाले म्हणाले होते. मंगळवारी सकाळी भाजपची बैठक होणार आहे. यात निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
गटनेत्याने बोलाविलेल्या बैठकीकडे सदस्यांची पाठ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते दिनेश बंग हे हिंगणा विधानसभेत सभापतीपद द्यावे यासाठी आग्रही आहेत. जि.प. सदस्य सलील देशमुख हे काटोल विधानसभेत सभापती मिळावा यासाठी प्रयत्नात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गटनेते दिनेश बंग यांनी निवडणुकीबाबत सदस्यांची बैठक बोलावली होती. परंतु, बैठकीला सर्वांनीच पाठ दाखविल्याची माहिती आहे.