नागपुरात ४,३०० थकबाकीदारांची वीज कापली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:06 PM2020-02-29T23:06:47+5:302020-02-29T23:10:46+5:30
शहरातील विजेचे थकीत बिल वाढून १०८.४४ कोटी रुपयांवर पोहोचल्याने चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुलीची गती वाढवली आहे. या वर्षातील दोन महिन्यात ४,३०० थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विजेचे थकीत बिल वाढून १०८.४४ कोटी रुपयांवर पोहोचल्याने चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुलीची गती वाढवली आहे. या वर्षातील दोन महिन्यात ४,३०० थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. महावितरणचे पथक घरोघरी जाऊन वीज बिल भरण्याची विनंती करीत आहेत.
महावितरणच्या आकडेवारीनुसार, शहरातील वीज बिलाची थकबाकी १०८.४४ कोटी रुपये झाली आहे. सर्वाधिक थकबाकी सिव्हिल लाईन्स डिव्हिीजनची आहे. येथे ३८.१७ कोटी रुपये थकबाकी आहे. यानंतर महाल डिव्हिजनमध्ये ३१.०५ कोटी रुपये आणि गांधीबाग डिव्हिजनमध्ये २४.५९ कोटी रुपयांचे वीज बिल ग्राहकांनी भरलेले नाही. हे तिन्ही डिव्हिजन वितरण फ्रेंचाईजी एसएनडीएलच्याअंतर्गत होते. दुसरीकडे महावितरणकडे असलेल्या काँग्रेसनगर डिव्हिजनमध्ये १०.३७ कोटी रुपये आणि एमआयडीसी डिव्हिजनमध्ये ४.२५ कोटी रुपयांचे वीज बिल ग्राहकांनी भरलेले नाही.
आता महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ४,३०० वीज कनेक्शन कापण्यात आले आहेत. यापैकी २,९०० वीज कनेक्शन सिव्हिल लाईन्स, गांधीबाग आणि महाल डिव्हिजनमधील आहेत. उर्वरित १४०० कनेक्शन काँग्रेसनगर व बुटीबोरी-हिंगणा डिव्हिजनमधील आहेत. महावितरणने फ्रेंचाईजीकडे असलेल्या तिन्ही डिव्हिजनमध्ये प्रत्येकी १५ कर्मचाऱ्यांचे एक थकीत वसुली पथक तैनात केले आहे. उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सेवाही घेतली जात आहे. बिल न भरणाºया ग्राहकांचे कनेक्शन कापले जात आहे. वीज कनेक्शन कापल्याच्या एक महिन्यापर्यंत थकीत बिल भरले गेले नाही तर कनेक्शन नेहमीसाठी कट करण्याचीही तरतूद आहे.
महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले की, थकबाकी वसुलीची मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. कारवाईपासून वाचण्यासाठी तातडीने थकीत बिल ग्राहकांनी भरावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे महावितरणने त्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करणे सुरू केले आहे, ज्या ठिकाणी थकबाकी अधिक आहे. या परिसरांमध्ये लष्करीबाग, बिनाकी, मोमिनपुरा, हसनबागसह अनेक झोपडपट्ट्यांचा समावेश आहे.
वसुलीदरम्यान १५ ठिकाणी विरोध
एसएनडीएलच्या परिसरात वीज पुरवठ्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर थकीत वसुलीसाठी गेलेल्या पथकाला १५ ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागला. मारहाणीच्या पाच घटना घडल्या. यात पोलीस तक्रारही करण्यात आली. अनेक ठिकाणी पथकाला शिवीगाळही झाली. एसएनडीएलचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी पोलीस आयुक्तांशी भेट घेऊन त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. आता पोलीस व महावितरण समन्वयातून वसुलीची कारवाई करीत आहे.
नगरसेवक-नेते निशाण्यावर
महावितरणच्या सूत्रानुसार, वसुली मोहिमेंतर्गत अनेक नगरसेवक व काही नेत्यांच्या घरीही वसुली पथक धडकले आहे. शहरातील काही नगरसेवकांकडे वीज बिल थकीत आहे. सध्या महावितरणचे पथक पोहोचताच त्यांनी बिल भरले आहे.
रि-कनेक्शन शुल्कावर जीएसटी
बिल न भरल्यामुळे कापलेले वीज कनेक्शन जोडले जात आहे. परंतु यासाठी ग्राहकांना शुल्कासह जीएसटीही भरावी लागत आहे. सिंगल फेज कनेक्शनसाठी १०० रुपये तर थ्री फेजसाठी २०० रुपये शुल्क भरणे निश्चित करण्यात आले आहे.