नागपुरात वीज कर्मचाऱ्याकडून युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:26 PM2019-11-12T22:26:19+5:302019-11-12T22:26:38+5:30
वीज मंडळाच्या कंत्राटी कामगाराने एका युवतीवर (वय १७) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावून आली आणि त्यांनी आरोपीला बेदम चोप दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज मंडळाच्या कंत्राटी कामगाराने एका युवतीवर (वय १७) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावून आली आणि त्यांनी आरोपीला बेदम चोप दिला. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोतवालीमध्ये ही घटना घडली.
प्रशांत श्रावण गायकवाड (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो हुडकेश्वरमधील अंबिकानगरात राहतो. वीज मंडळात तो कंत्राटी कामगार आहे. त्याच्याकडे मीटरचे रिडिंग घेण्याची जबाबदारी आहे. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी प्रशांत कोतवालीतील मीटर रिडिंग घेत होता. पीडित युवतीच्या घरातील मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर त्याने तिला पिण्यासाठी पाणी मागितले. ती घरात पाणी आणायला गेली. घरात तिच्याशिवाय दुसरे कुणी नसल्याचा अंदाज आल्यामुळे आरोपीची मती फिरली. त्याने घरात मागून जाऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपी प्रशांतला पकडून त्याची बेदम धुलाई केली. त्यानंतर कोतवाली पोलिसांना बोलवून घेतले. पोलिसांनी आरोपी प्रशांत गायकवाडविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
यापूर्वीही घडल्या घटना
मीटर रिडिंगच्या बहाण्याने आलेल्या आरोपींनी महिला-मुलींचा विनयभंग करण्याच्या घटना यापूर्वीही शहरात घडल्या आहेत. बदनामीच्या धाकाने अनेक प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही. काही ठिकाणी मात्र अशा भामट्यांना चोप देऊन पोलिसांच्या हवाली केल्याचेही अनेक प्रकार घडले आहेत.