नागपूर कामगार विमा रुग्णालय : बंद पॅथालॉजी तंत्रज्ञानाच्या वेतनावर खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:40 AM2018-11-02T00:40:18+5:302018-11-02T00:41:23+5:30
एकीकडे कामगार विमा रुग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञ असताना आवश्यक यंत्रसामुग्री व त्याला लागणारे रसायन उपलब्ध नाही. परिणामी, पॅथालॉजी विभाग बंद पडला आहे. मात्र येथील पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा कारभाराचा बोजवारा उडाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे कामगार विमा रुग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञ असताना आवश्यक यंत्रसामुग्री व त्याला लागणारे रसायन उपलब्ध नाही. परिणामी, पॅथालॉजी विभाग बंद पडला आहे. मात्र येथील पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा कारभाराचा बोजवारा उडाला आहे.
कामगार विमा रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. नवी पद भरती होत नसल्याने कार्यरत डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. अद्ययावत यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठविले जात आहे. यातही संबंधित रुग्णालयाचे देयके प्रलंबित ठेवली जात असल्याने खासगी रुग्णालये सेवा देणे बंद करीत आहे. उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याचा रुग्णांचा आरोप आहे.
प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात तंत्रज्ञाची पदे शासनाकडून भरण्यात न आल्यामुळे मागील १० वर्षांपासून या विभागाची ‘आऊटसोर्सिंग’ सुरू आहे. ‘रेनबो ब्लड बँक’ या खासगी पॅथालॉजीला रुग्णालयाच्या रुग्णाचे नमुने पाठविले जात आहे. वर्षभरापूर्वी रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात शासनाने दोन तंत्रज्ञ व तीन सहायक तंत्रज्ञ अशी पाच तंत्रज्ञांची भरती केली. परंतु, अत्याधुनिक यंत्रसामुग्री व रक्त तपासणीचे रसायन उपलब्धच करून दिले नाही. यामुळे या तंत्रज्ञांच्या हाताला कामेच नाही. यांच्या वेतनांवर लाखो रुपयांचा खर्च होत आहे. खासगी पॅथालॉजीचा कर्मचारी रुग्णालयात येऊन रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन जातात. मग, तंत्रज्ञाची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पैशाची उधळपट्टी कधी थांबणार?
एका तंत्रज्ञाचे साधारण ४० हजार रुपये वेतन, तर सहायक तंत्रज्ञाचे २५ ते ३० हजार वेतन आहे. रुग्णांना कवडीचाही फायदा होत नसताना शासनाकडून दर महिन्याला पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर मात्र लाखो रुपये खर्च होत आहे. ही कामगारांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे रुग्णाचे म्हणणे आहे.
काही तपासण्या केल्या जातात
सामान्य तपासण्या रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात तंत्रज्ञकडून केल्या जातात. यात ‘रेडी किट’ची मदत घेतली जाते. उर्वरित ‘आऊटसोर्सिंग’द्वारे केल्या जातात. रुग्णालयाकडून लवकरच कंत्राटी पद्धतीवर पॅथालॉजिस्ट घेण्यात येणार आहे.
डॉ. मीना देशमुख
वैद्यकीय अधीक्षक, कामगार विमा रुग्णालय