नागपुरातील अभियंत्याला सव्वाआठ लाखांचा गंडा; भूखंडाची रक्कम हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:26 PM2018-02-06T14:26:05+5:302018-02-06T14:26:18+5:30
भूखंड विक्रीचा करारनामा करून नागपुरातील एका अभियंत्याकडून सव्वा आठ लाख रुपये हडपणाऱ्या दोन दलालांवर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूखंड विक्रीचा करारनामा करून नागपुरातील एका अभियंत्याकडून सव्वा आठ लाख रुपये हडपणाऱ्या दोन दलालांवर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. तेलंगखेडी मार्गावर राहणारे रूचीत धनराज लाडे हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता आहेत. त्यांनी कोराडी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, स्वत:चे घर बांधण्यासाठी लाडे अनेक दिवसांपासून कोराडी परिसरात भूखंड शोधत होते. पुरुषोत्तम मारोती साखरे (वय ६३, रा. हुडको कॉलनी, नारा) आणि अॅन्थोनी शंकर टेंभेकर (वय ३५, रा. सुगतनगर) या दोघांसोबत त्यांची दीड वर्षांपूर्वी भेट झाली. काळे लॅण्ड डेव्हलपर्सच्या कोराडीतील खसरा क्रमांक १३९ मधील लेआउटमध्ये आपला भूखंड आहे, असे आरोपींनी लाडे यांना सांगितले. त्यावरून त्यांनी आरोपी साखरे आणि टेंभेकर सोबत ३२ क्रमांकाचा भूखंड विकत घेण्याचा सौदा केला. त्यांना ८ लाख, १५ हजार रुपये दिले. १ जुलै २०१६ ते ७ मे २०१७ या कालावधीत आरोपींनी लाडे यांच्याकडून ही रक्कम घेतली. आता दीड वर्षाचा कालावधी झाला तरी त्यांनी या भूखंडाची विक्री लाडे यांना करून दिली नाही. संशय बळावल्यामुळे लाडे यांनी चौकशी केली असता तो भूखंड आरोपींचा नसल्याचे त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली. मात्र, आरोपींनी रक्कमही परत केली नाही. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे लाडे यांनी कोराडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पुंडलीक बोंडे आरोपींचा शोध घेत आहेत.