नागपूरच्या अभियंत्याने रेल्वेसाठी बनविला ‘एम्प्टी लोड बॉक्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 08:29 PM2023-03-31T20:29:59+5:302023-03-31T20:30:32+5:30
Nagpur News रेल्वेच्या वॅगनमध्ये लावल्या जाणाऱ्या एम्प्टी लोड बॉक्समध्ये महत्त्वपूर्ण बदल करून ‘सिग्नल पास ॲट डेन्जर’ची समस्या निकाली काढण्याची कामगिरी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एका अभियंत्याने बजावली आहे.
नागपूर : रेल्वेच्या वॅगनमध्ये लावल्या जाणाऱ्या एम्प्टी लोड बॉक्समध्ये महत्त्वपूर्ण बदल करून ‘सिग्नल पास ॲट डेन्जर’ची समस्या निकाली काढण्याची कामगिरी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एका अभियंत्याने बजावली आहे. नरेश एल. जिद्देवार असे या अभियंत्याचे नाव असून, त्यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या नवीन लोड बॉक्सची उपयुक्तता लक्षात आल्याने रेल्वेच्या शीर्षस्थ पातळीवरून त्यांची दखल घेण्यात आली आहे.
रेल्वेच्या वॅगनमध्ये एम्प्टी लोड बॉक्स नामक उपकरण लावलेले असते. गाडी खाली असो वा भरून दोन्ही स्थितीत हा बॉक्स गाडीचा वेग नियंत्रित करतो. अपघाताचा धोका टाळण्यातही या बॉक्सची महत्त्वाची भूमिका असते. अभियंता जिद्देवार यांनी त्यात अनेक दिवस अभ्यास करून काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्याची ऑनपेपर ट्रायलही दिली.
नव्या बदलामुळे गुड्स ट्रेन ब्रेक पॉवर संबंधीच्या लोडेड स्थितीतील सिग्नल पास ॲट डेन्जरची समस्या निकाली निघणार असल्याचे त्यातून संकेत मिळाले आहेत. या नव्या बदलामुळे रेल्वेचे सहज सुलभ संचालन करता येणार आहे. सोबतच या उपकरणामुळे रेल्वे खात्याचा अन्य साहित्यावर होणारा खर्च वाचणार आहे. अर्थात महसुलातही वाढ होणार आहे. स्थानिक वरिष्ठांकडून जिद्देवार यांनी बनविलेल्या उपकरणाची रेल्वेच्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. त्यामुळे लखनौच्या अनुसंधान, डिझाइन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी या उपकरणाची पाहणी करून चाचणी घेतली. हे उपकरण अत्यंत उपयुक्त, वापरण्यास सुलभ आणि मेंटेनन्स फ्री असल्याचा निष्कर्ष या चमूने काढला आहे.
विभागीय व्यवस्थापकांना पत्र
आरडीएसओ लखनऊच्या टीमने या उपकरणाची उपयुक्तता लक्षात घेत त्यांनी जिद्देवार यांची प्रशंसा केली आहे. त्यासंबंधाने आरडीएसओच्या संचालकांनी जिद्देवारांचे काैतुक करणारे पत्र रेल्वे विभागीय व्यवस्थापक, नागपूर यांना दिल्याचे येथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
-----