Nagpur: महागड्या कार पूर्णत: ‘डॅमेज’, बहुतांश कारची इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब
By मोरेश्वर मानापुरे | Published: October 22, 2023 09:39 PM2023-10-22T21:39:12+5:302023-10-22T21:39:31+5:30
Nagpur: नागपुरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि कार व घरातील महागड्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या.
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - नागपुरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि कार व घरातील महागड्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या. घटनेला रविवार, २२ ऑक्टोबरला एक महिना झाला असून पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब झाल्यामुळे काही महागड्या इर्म्पोरटेड कार पूर्णपणे डॅमेज झाल्या आहेत. सर्वाधिक फटका ईव्ही आणि पेट्रोल कारला बसला.
अंबाझरी परिसर, वर्मा ले-आऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, समता कॉलनी, रामदासपेठ, धंतोली, गणेशपेठ परिसर आणि अन्य वस्त्यांमध्ये फ्लॅटच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये ठेवलेल्या कार पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. पुराचे पाणी वाहून जाण्याचा रस्ता प्रशासनाची चुकी आणि अतिक्रमणामुळे अरूंद असल्याने लोकांच्या घरात पहिल्या माळ्यापर्यंत पाणी शिरले होते. मोटर्स लावून पुराचे पाणी बाहेर काढल्यानंतर कार त्या त्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या. त्यादिवशी पुरात बुडालेल्या कारचा आकडा आसपास १ हजार होता.
इंजिनमधील पाणी बाहेर निघाल्यानंतर काही कार सुरू झाल्या, तर जवळपास ६०० कार कंपन्याच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी आल्या. इन्शुरन्स कंपन्यांचे क्लेम सेंटलमेंटचे काम १५ दिवस सुरू होते. कारची स्थिती पाहून क्लेम मिळालेल्या कारची दुरुस्ती सर्व्हिस सेंटरमध्ये झाली आहे. तर काही कारच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे.
नांगिया कार्सचे (एमजी) संचालक अक्षित नांगिया म्हणाले, आमच्याकडे पुरात बुडालेल्या ३२ कार सर्व्हिसिंगसाठी आल्या. त्यापैकी २ कार पूर्णपणे खराब झाल्या असून दुरुस्ती शक्य नाही. बहुतांश पेट्रोल आणि ईव्ही कारमधील इर्म्पोरटेड इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खराब झाली आहेत. नियमित काम सांभाळून इन्शुरन्स क्लेमच्या आधारे दुरुस्ती करण्यात येत आहे.
आदित्य कार्सचे संचालक डॉ. पी.के. जैन म्हणाले, पुरात बुडालेल्या काही महागड्या कारचे इंजिन पूर्णपणे खराब झाले आहेत. अशा कारच्या दुरुस्तीसाठी जास्त खर्च येतो. इन्शुरन्स कंपन्यांनी अशा कार ‘टोटल लॉस’ म्हणून निकाली काढल्या आहेत. इंजिनमध्ये पाणी शिरलेल्या कारची दुरुस्ती जास्त असते. शिवाय खर्चही जास्त येतो. जैन म्हणाले, पुरामुळे अंबाझरी परिसरातील काही लोकांच्या घरातील कार, दुचाकी, टीव्ही, फ्रिज, कपडे आणि अनेक महत्त्वाच्या वस्तू पूर्णपणे खराब झाल्या आहेत. प्रशासनाने पुरापासून धडा घेऊन सक्षम उपाययोजन कराव्यात.