नागपूर स्फोट प्रकरण: 'सोलर इंडस्ट्रीज’मध्ये हलगर्जी, निष्काळजीमुळे स्फोट झाल्याचा दावा

By योगेश पांडे | Published: December 19, 2023 12:29 AM2023-12-19T00:29:50+5:302023-12-19T00:30:30+5:30

स्फोटाच्या वेळी शिकाऊ सुपरवायझर अन् कामगारच होते आत

Nagpur explosion case Claims that the explosion was due to laxity negligence in Solar Industries | नागपूर स्फोट प्रकरण: 'सोलर इंडस्ट्रीज’मध्ये हलगर्जी, निष्काळजीमुळे स्फोट झाल्याचा दावा

नागपूर स्फोट प्रकरण: 'सोलर इंडस्ट्रीज’मध्ये हलगर्जी, निष्काळजीमुळे स्फोट झाल्याचा दावा

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ‘सोलर इंडस्ट्रीज’मधील दुर्दैवी घटनेला ३६ तासांचा कालावधी उलटून गेल्यावरदेखील स्फोटाचे कारण कळालेले नाही. मात्र ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी केवळ शिकाऊ सुपरवायझर व कामगारच युनिटच्या आत कामाला होते असा खुलासा समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून हलगर्जी व निष्काळजीमुळेच स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा स्थितीत स्फोटासाठी कुणाला नेमके जबाबदार ठरविणार की कामगारांचीच चूक असल्याचा ठपका ठेवण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोमवारी मध्यरात्रीनंतर या प्रकरणात कोंढाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलर इंडस्ट्रीजमध्ये सीपीसीएच-२ युनिटमध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसर अक्षरश: हादरला. या युनिटमध्ये कोळसा खाणींसाठी वापरण्यात येणारे कास्ट बुस्टर उत्पादित करण्यात येत होते. तेथे अगोदर टीएनटी व इतर कच्च्या मालाची चाळणी प्रक्रिया होते. त्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून आठ कामगार, एक शिकाऊ सुपरवायझर, दोन पॅकिंग व लोडिंग ऑपरेटर कामावर होते. सुपरवायझर पावणेनऊ वाजता लघुशंकेसाठी बाहेर गेला तर दोन्ही ऑपरेटर टीएनटीचे रिकामे बॉक्स टीएनटी रूममध्ये ठेवण्यासाठी बाहेर गेले. घटनेच्या वेळी केवळ शिकाऊ सुपरवायझर व इतर कामगार हेच टीएनटी चाळणीचे काम करत होते. नेमका त्याच वेळी अचानक स्फोट झाला व क्षणात पूर्ण इमारत पत्त्यांसाठी खाली कोसळली. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे तंत्रज्ञांनादेखील सांगणे शक्य झालेले नाही.

आरोपी बनविणार तरी कुणाला ?

पोलिसांनी सद्य:स्थितीत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सुपरवायझरच्या बयाणानुसार हा स्फोट हलगर्जी व निष्काळजीपणामुळे झाला आहे. आता हा निष्काळजीपणा कुणी दाखविला हा मोठा प्रश्न पोलीस व इतर तपास यंत्रणांसमोर आहे. ‘क्रिमिनल लायबिलिटी’ आणि ‘सेफ्टी प्राेटाेकाॅल’ विचारात घेता या प्रकरणात सध्या भादंवि ३०४ (सदाेष मनुष्यवध) ऐवजी भादंवि ३०४ (अ), २८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज व इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी केली जात आहे, असे पोलिस अधीक्षक हर्ष पाेद्दार यांनी स्पष्ट केले. आता पोलिस नेमके कुणाला आरोपी बनविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Nagpur explosion case Claims that the explosion was due to laxity negligence in Solar Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.