नागपुरात नकली पोलिसांचा हैदोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:07 AM2018-05-01T01:07:28+5:302018-05-01T01:07:50+5:30

तोतया पोलिसांनी आज शहरातील वेगवेगळ्या भागात हैदोस घालून खळबळ उडवून दिली. अवघ्या पावणेतीन तासात त्यांनी सीताबर्डी, अंबाझरी, हुडकेश्वर आणि बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ज्येष्ठ नागरिकांचे चार ते पाच लाखांचे दागिने लुटून नेले. सोमवारी सकाळी ८.४५ ते ११.३० या वेळेत या घटना घडल्या.

In Nagpur fake police riots up! | नागपुरात नकली पोलिसांचा हैदोस !

नागपुरात नकली पोलिसांचा हैदोस !

Next
ठळक मुद्देपावणेतीन तासात चार गुन्हे : लाखोंचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोतया पोलिसांनी आज शहरातील वेगवेगळ्या भागात हैदोस घालून खळबळ उडवून दिली. अवघ्या पावणेतीन तासात त्यांनी सीताबर्डी, अंबाझरी, हुडकेश्वर आणि बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ज्येष्ठ नागरिकांचे चार ते पाच लाखांचे दागिने लुटून नेले. सोमवारी सकाळी ८.४५ ते ११.३० या वेळेत या घटना घडल्या.
सीताबर्डी : सकाळी ८.४५ वाजता
ओमकार अपार्टमेंट, खरे टाऊनमध्ये राहणारे मधुकर मारोतराव पाटील (वय ६६) हे अ‍ॅक्टिव्हाने लक्ष्मीभवन चौकात आले. तेथून फूल घेऊन ते घराकडे जात असताना बटुकभाई ज्वेलर्ससमोर काळ्या रंगाच्या पल्सरवरील दोन आरोपींनी रोखले. आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत. ज्येष्ठ नागरिकांना लुटले जात आहे, अशात तुम्ही अंगावर दागिने घालून कुठे फिरता, असे म्हणत त्यांना सोन्याची अंगठी आणि गोफ काढून रुमालात बांधण्यास सांगितले. आरोपींनी स्वत:च पाटील यांचे दागिने त्यांच्याजवळच्या रुमालामध्ये बांधले आणि तो रुमाल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. पाटील घरी पोहचले आणि त्यांनी रुमालाची गाठ सोडून बघितली तेव्हा त्यात दागिने नव्हते. जुन्या किमतीनुसार या दागिन्यांची किंमत पोलिसांनी ९५ हजार रुपये नोंदवली. प्रत्यक्षात हे दागिने एक ते दीड लाख रुपये किमतीचे आहे.
अंबाझरी : सकाळी ९ वाजता
पुरोहित लेआऊटमधील रहिवासी गोपाल बालाजी झाडे (वय ७९) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी फिरून झाल्यानंतर दुचाकीने घराकडे निघाले. त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांना पल्सरवरील दोन आरोपींनी थांबवले. आम्ही पोलीस आहोत, असे सांगून सोन्याचे दागिने घालून कशाला फिरता, असा दम देत त्यांनी घातलेली सोनसाखळी तसेच अंगठ्या काढून घेतल्या अन् पळून गेले. अंबाझरी पोलिसांनी या दागिन्यांचे मूल्यांकन ७० हजार रुपये नोंदवले.
बेलतरोडी : सकाळी १०.१० वाजता
जयदुर्गा सोसायटी, महेशनगर येथे राहणारे वामनराव प्रेमाजी नंदागवळी (वय ६९) हे आज सकाळी नरेंद्रनगरात आयोजित बौद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून घरी जात असताना बेलतरोडीच्या नगरविकास सोसायटीत त्यांना मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी रोखले.
आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत. नुकताच आम्ही गांजा पकडला आहे. तुमचे वर्तन संशयास्पद वाटते. तुमच्याकडे काय आहे, अशी विचारणा करीत नंदागवळीवर दडपण आणले. तपासणीचा बनाव करून या दोघांनी नंदागवळी यांच्याजवळचे दुचाकीचे कागदपत्र, सोनसाखळी, दोन अंगठ्या आणि ३०० रुपये असा सर्व एक ते दीड लाखांचा ऐवज रुमालमध्ये बांधल्याचा बनाव केला. तो रुमाल नंदागवळी यांच्या डिक्कीत ठेवून आरोपी निघून गेले. घरी गेल्यानंतर नंदागवळी यांनी रुमाल बघितला तेव्हा त्यात दागिने आणि रुपये नव्हते.
हुडकेश्वर : सकाळी ११.३० वाजता
कुही (जि. नागपूर) जवळच्या गाव अडम येथील रहिवासी वामन जागोबाजी चुटे (वय ६५) सोमवारी सकाळी त्यांच्या पत्नीसह गावूाहन एसटी बसने नागपुरात आले. दिघोरी परिसरात त्यांचा मुलगा राहतो. त्यामुळे सकाळी ११ च्या सुमारास ते बसमधून दिघोरी थांब्यावर उतरून पायीच मुलाच्या घराकडे निघाले. काही अंतरावर टाईल्सच्या दुकानासमोर पल्सरवरील दोन आरोपींनी त्यांना थांबवले. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून त्यांनी चुटे दाम्पत्याजवळचे सामान तपासण्याचा पवित्रा घेतला. चुटे यांनी त्यांना ओळखपत्र मागितले असता, आरोपींनी त्यांच्याजवळचे बनावट ओळखपत्र दाखवून तपासणीचा बनाव केला. त्यानंतर चुटे दाम्पत्यांना त्यांच्या अंगावरील दागिने काढून ठेवा, येथे लुटमार होत आहे, अशी भीती दाखवून पती-पत्नीच्या अंगावरचे दागिने एका दुपट्ट्यात बांधायला सांगितले. तो दुपट्टा पिशवीत ठेवून आरोपी निघून गेले. चुटे दाम्पत्य मुलाच्या घरी पोहचल्यावर त्यांनी दुपट्ट्याची गाठ उघडून बघितली असता त्यात दागिने नव्हते. सुमारे एक लाखाचे दागिने लुटारूंनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद
अवघ्या पावणेतीन तासात चार ज्येष्ठ नागरिकांचे लाखोंचे दागिने लंपास करणारे आरोपी पळून गेले असले तरी, विविध भागातील सीसीटीव्हीत ते कैद झाले आहेत. पीडितांच्या तक्रारीवरून सीताबर्डी, अंबाझरी, बेलतरोडी आणि हुडकेश्वर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या घटनांमुळे आज शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: In Nagpur fake police riots up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.