नागपुरात सासऱ्याने केली जावयाची बेदम धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:56 PM2018-07-21T21:56:45+5:302018-07-21T21:58:08+5:30
पत्नी आणि मुलीला आणण्यासाठी सासऱ्याच्या घरी गेलेल्या तरुणाला त्याच्या सासऱ्याने बेदम मारहाण केली. जबर जखमी झाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून सासऱ्याने जावयाला एका खोलीत डांबून ठेवले. कशीबशी सुटका करून जावई डॉक्टरकडे पोहचला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नी आणि मुलीला आणण्यासाठी सासऱ्याच्या घरी गेलेल्या तरुणाला त्याच्या सासऱ्याने बेदम मारहाण केली. जबर जखमी झाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून सासऱ्याने जावयाला एका खोलीत डांबून ठेवले. कशीबशी सुटका करून जावई डॉक्टरकडे पोहचला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरा गांधीनगर आहे. तेथील रहिवासी नाना सीताराम रामटेके (वय ३५) याचा त्याच्या पत्नीसोबत काही दिवसांपूर्वी घरगुती वाद झाला. त्यामुळे नानाची पत्नी आपल्या मुलीला घेऊन रागाच्या भरात माहेरी गेली. तिचे वडील नागसेनवन नगरात राहतात. राग शांत झाल्यानंतर १२ जुलैच्या रात्री ८.३० च्या सुमारास नाना रामटेके त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला. यावेळी सासरा नरेंद्र नितनवरे (वय ५२) याच्यासोबत नानाचे कडाक्याचे भांडण झाले. जावई आपल्या घरी येऊन भाईगिरी करीत असल्याचे पाहून आरोपी सासरा नितनवरे याने लाकडी बत्त्याने नानाला बदडणे सुरू केले. पाठीवर, हातावर, नाकातोंडावर तसेच डोक्यावर फटके हाणून नितनवरेने नानाला जबर जखमी केले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जाऊ नये म्हणून त्याला आपल्या घरातील एका खोलीत डांबून ठेवले. या घटनेची तक्रार नानाने यशोधरानगर पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी आरोपी सासºयाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी नितनवरे हा आॅटोचालक असून, जखमी नाना भाजी विक्रेता असल्याचे पोलीस सांगतात.
म्हणून झाला विलंब
१२ जुलैच्या रात्रीच्या घटनेची तक्रार तब्बल आठ दिवसांनंतर नोंदविण्याचे कारण पोलिसांनी नानाला विचारले असता नानाने आपल्या जखमा पोलिसांना दाखवल्या. सासऱ्याने असे काही बदडले की नानाच्या सर्वांगावर सूज आली होती. ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्या रात्री सासऱ्याने खोलीत डांबून ठेवल्याने तो असहाय झाला होता. सकाळी सासऱ्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर नानाने रुग्णालयात धाव घेतली. तेथे आठवडाभर उपचार करून घेतले. आता बरे वाटत असल्यामुळे आपण ठाण्यात आल्याचे नानाने पोलिसांना सांगितले.