अखेर नागपूरला मिळाले तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:25 AM2020-09-19T00:25:26+5:302020-09-19T00:26:34+5:30
गृहमंत्र्यांचे होम टाऊन असलेल्या नागपूरला अखेर एकाच वेळी तिन्ही अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी मिळाले. गुरुवारी राज्यातील पोलीस अधीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गृहमंत्र्यांचे होम टाऊन असलेल्या नागपूरला अखेर एकाच वेळी तिन्ही अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी मिळाले. गुरुवारी राज्यातील पोलीस अधीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली. यादीत नागपूरच्या तिन्ही अतिरिक्त आयुक्तपदाच्या रिक्त जागा भरण्यात आल्या. गुरुवारी जाहीर झालेल्या यादीनुसार सध्या औरंगाबादला विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) म्हणून कार्यरत असलेले दिलीप झळके, एसआरपीएफ पुणे येथील उपमहानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी आणि बदली होऊनही नियुक्तीचे ठिकाण जाहीर न झाल्याने प्रतीक्षेत असलेले सुनील फुलारी या तिघांची नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली झालेली आहे. झळके यांना दक्षिण विभाग तर रेड्डी यांना उत्तर विभागाचा कार्यभार देण्यात येणार आहे. बदली आदेशातच तसे नमूद असून फुलारी यांना गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या तिन्ही पदाची जबाबदारी सध्या अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे सांभाळत आहेत.
सहपोलीस आयुक्तांचे पद मात्र तूर्त रिक्तच ठेवण्यात आले आहे. सध्या या पदाची जबाबदारीसुद्धा अतिरिक्त आयुक्त डॉ. भरणेच सांभाळत आहेत. भरणे यांच्या जागी अर्थात गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून सुनील फुलारी यांची नियुक्ती झाली असल्याने भरणे यांना प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्याने कार्यमुक्त केले जाणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भरणे उत्तराखंडमध्ये कॅडरचे आयपीएस अधिकारी असून गेल्या पाच वर्षांपासून नागपुरात कार्यरत आहेत.