मतदार छायाचित्र अपडेट करण्यात नागपूर राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 09:16 PM2022-08-18T21:16:37+5:302022-08-18T21:17:11+5:30
Nagpur News मतदार छायाचित्र अपडेट करण्यात नागपूर महानगर हे राज्यात प्रथम असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.
नागपूर : मतदार छायाचित्र अपडेट करण्यात नागपूर महानगर हे राज्यात प्रथम असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.
मतदार यादीशी आधार क्रमांक जोडणी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी निवडणूक मीनल कळसकर, उपविभागीय अधिकारी नागपूर शेखर घाडगे, तहसीलदार राहुल सारंग तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मतदार पुनरिक्षण कार्यक्रम वर्षातून चारदा होणार असल्यामुळे मतदारांनी नमुना ६-ब भरून नाव नोंदणी, वगळणी व इतर बदल करून घ्यावेत. काही तालुक्यांत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे. महिला मतदारांच्या संख्या वाढीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. राजकीय पक्षांनी मतदान कार्डाशी आधार संलग्न करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यास सहकार्य करावे. आधार संलग्न मतदान कार्ड करणे हे ऐच्छिक असून, त्यामुळे एकाच मतदाराचे नाव विविध मतदारसंघात असल्यास ते कळेल व एका व्यक्तीसाठी एकच मतदान कार्ड राहील, त्यासोबतच मतदाराची ओळख प्रस्थापित होऊन मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण होईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.