नागपुरात मेट्रोची पहिली ‘जॉय राईड ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:35 PM2018-05-04T22:35:40+5:302018-05-04T22:35:52+5:30
शहरात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो रेल्वेचे काम पाहून नागपुरकराना कधी एकदा ‘मेट्रो’त बसून फेरफटका मारतो असे झाले आहे. नेमके हेच हेरून मेट्रो रेल्वे प्रशासनाने दक्षिण विमानतळ मेट्रो स्थानक ते खापरी अशी ‘जॉय राईड’ म्हणजेच आनंददायी प्रवास सुरू केला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नोंदणी केलेल्या सामान्य नागरिकांना हा आनंद घेता येणार आहे. याची सुरूवात शुक्रवारी शहरातील विविध वृत्तपत्रांच्या पत्रकारांना घेऊन झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो रेल्वेचे काम पाहून नागपुरकराना कधी एकदा ‘मेट्रो’त बसून फेरफटका मारतो असे झाले आहे. नेमके हेच हेरून मेट्रो रेल्वे प्रशासनाने दक्षिण विमानतळ मेट्रो स्थानक ते खापरी अशी ‘जॉय राईड’ म्हणजेच आनंददायी प्रवास सुरू केला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नोंदणी केलेल्या सामान्य नागरिकांना हा आनंद घेता येणार आहे. याची सुरूवात शुक्रवारी शहरातील विविध वृत्तपत्रांच्या पत्रकारांना घेऊन झाली.
स्थळ-दक्षिण विमानतळ मेट्रो स्थानक. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक पत्रकारांची गर्दी झाली. प्रशस्त व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेले मेट्रोचे स्थानक पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. परंतु मेट्रो रेल्वे रूळावर नसल्याने याची विचारपूसही करीत होते. आणि त्याच वेळी एक घोषणा झाली. मेट्रो रेल्वे ही फ्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येत असल्याची. दुरून डौलात येणारी मेट्रो रेल्वे पाहून अनेकांच्या तोंडून ‘वा’ हा एकच शब्द बाहेर पडला. मोबाईलमधून ‘फोटो शूट’ करणे सुरू झाले. एका ‘सेलिब्रिटी’ सारखेच.
तीन कोचमधून ९०० लोकांचा प्रवास
फ्लॅटफॉर्मवर थांबलेल्या मेट्रो रेल्वेचे स्वयंचलित दरवाजे उघडले. डब्याच्या आत प्रवाशांसाठी डिजीटलपद्धतीने माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. या सर्वांचे अवलोकन करताना अनेकांच्या तोंडी ‘माझी मेट्रो’ हे शब्द होते. यावेळी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास सुरूवात केली. त्यांच्यानुसार, सध्या तीन कोच असलेली ही मेट्रो रेल्वे केवळ चाचणीसाठी आहे. चीन येथून येणारी मेट्रो रेल्वे ही यापेक्षा सुंदर आणि अत्याधुनिक असेल. एकाचवेळी तीन कोचमध्ये साधारण ९०० लोक प्रवास करू शकतील अशी सोय असेल.
आकर्षक खापरी स्टेशन
मेट्रो खापरी स्थानकावर रेल्वे पोहचताच वाघाच्या ‘थ्री डी’ चित्राने प्रत्यकाचे लक्ष वेधले. हे स्थानक ‘आर्किटेक्ट’चा कसा उत्कृष्ठ नमुना आहे हे अधिकारी सांगत होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्थानकाच्या बाहेरील रुपावरून, आतील बांधकामावरून, अत्याधुनिक सोयी यावरून सर्वांनाच आले. जुन्या चित्रपटातील रेल्वे स्थानकाचे स्वरुप या स्थानकाला देण्यात आले. स्थानकाचे आणखी एक वैशिष्टे म्हणजे, भिंतीवर केलेली आकर्षक पेटींग.
न्यू एअरपोर्ट स्थानकावर ‘तथागत गौतम बुद्ध’
खापरी रेल्वे स्थानकावरून परत येताना मेट्रो न्यू एअरपोर्ट स्थानकावर थांबली. येथे ध्यानस्थ बसलेल्या तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा हे या स्थानकाचे वैशिष्ट ठरले. मूर्तीच्यावर असलेला डोम आणि त्यातून मूर्तीवर पडणारा सूर्य प्रकाशाने मूर्ती आणखी आकर्षक दिसत होती.चेन्नई येथील एका कलावंताने ही मूर्ती उभारल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो पुन्हा आपल्या दक्षिण विमानतळ स्थानकावर येताच अधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले. यात नागपूर मेट्रोचे महाव्यवस्थापक (आॅपरेशन) सुधाकर उराडे, महाव्यवस्थापक (व्यवस्थापन) अनिल कोकाटे, सीपीएम (पीएस) एच. पी. त्रिपाटी, सहायक महाव्यवस्थापक (आॅपरेशन) के. वी. उन्नीकृष्णन, डीजीएम (सीसी) अखिलेश हलवे आदींचा सहभाग होता. मेट्रो रेल्वेचे चालक होत्या सुमेधा मेश्राम.
भंडारा, रामटेक, काटोल, वर्धा पर्यंत मेट्रोची सेवा!
‘जॉय राईड’ नंतर आयोजित पत्रपरिषदेत माहिती देताना महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, नागपुरात मेट्रो रेल्वेचे काम गतीने सुरू आहे. कमी वेळात पहिला टप्पा पूर्णत्वाचा मार्गावर. दुसºया टप्प्यातील प्रकल्पाचा अहवालही तयार आहे. या दरम्यान भंडारा, रामटेक, काटोल व वर्धापर्यंत मेट्रो रेल्वे नेण्याचे प्रस्तावित असून रेल्वे प्रशासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दाखविली आहे. लवकरच करार होण्याची शक्यता आहे.