Nagpur: आता पूर्णवत झाले विमानांचे वेळापत्रक, ‘डीजीसीए’ने हटविले प्रतिबंध
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 20, 2024 08:55 PM2024-05-20T20:55:55+5:302024-05-20T20:57:07+5:30
Nagpur News: नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची देखभाल व दुरुस्तीसाठी (रिकार्पेटिंग) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूचनेनुसार दैनंदिन विमानतळाच्या वेळापत्रकात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची देखभाल व दुरुस्तीसाठी (रिकार्पेटिंग) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूचनेनुसार दैनंदिन विमानतळाच्या वेळापत्रकात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. या निर्णयाला दोन महिने झाली. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम अद्याप काम सुरू न झाल्याने विमानाचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच करण्यात आले असून त्यानुसार आता उड्डाणे दुपारीही होतील.
धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम भारतीय विमानतळ प्राधिकरण करणार आहे. त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण कंत्राटदार अजूनही नियुक्त झालेला नाही. काम केव्हापासून सुरू होणार, याची माहिती एएआयने विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) दिल्यानंतरच विमानाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होतील, असे एमआयएलच्या सूत्रांनी सांगितले. पण सध्या विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हे नेहमीच युद्धस्तरावर होते. पण एएआयने निविदा प्रक्रिया आणि कंत्राटदार नियुक्त करण्यात उशीर केला. निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्याची सूचना डीजीसीएने केली होती. काम केव्हापासून सुरू करणार, याची ठोस सूचना एएआयचे अधिकारी देतील, तेव्हाच विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असल्याचे एमआयएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मान्सूनमध्ये दुरुस्तीचे काम शक्य नाही
जून महिन्यात मान्सूनचे आगमन होईल. त्यामुळे धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम आणखी तीन महिने लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. धावपट्टीची देखभाल-दुरूस्तीची निविदा प्रक्रिया झाल्यानंतरही कंंत्राटदारांना काम सुरू करण्यासाठी तीन महिने वाट पाहावी लागेल. तोपर्यंत प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आधी वेळापत्रकात बदल झाल्याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला होता. विमाने रात्री येत असल्याने प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी टॅक्सीचे जास्त भाडे द्यावे लागत होते. सध्या ही वेळ टळली आहे.
उन्हाळ्याचा हंगाम पाहता विमान कंपन्या नवीन उड्डाणे सुरू करतात. उड्डाणाची वेळ सकाळी १० ते १२ अशी असते. पण आता वेळापत्रकात बदल झाल्याने नवीन उड्डाणे सुरू होऊ शकतात. स्टार एअर २८ मेपासून नागपूर-बेंगळुरू विमानेसवा दुपारी २.५५ वाजता सुरू करीत आहे. त्यामध्ये पुणे येथे जाणाºया विमानाचे शेड्युल सकाळी १० वाजता आहे. तर हेच विमान दुपारी १.२० वाजता नागपुरात परत येणार आहे. आता नवीन वेळापत्रकामुळे विमान कंपन्यांसह प्रवाशांना फायदा होईल.
वेळापत्रकात बदल
विमानाच्या वेळापत्रकात नव्याने बदल करण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम केव्हापासून सुरू होणार हे प्राधिकरणाने अद्याप कळविले नाही. प्राधिकरणाने कळविल्यानंतरच वेळापत्रकात बदल करण्यात येईल.
आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.