नागपुरात महिनाभरानंतर वनविभागाला पहिल्यांदा दिसली मगर; पकडण्यासाठी लावले पिंजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 08:06 PM2021-12-21T20:06:13+5:302021-12-21T20:06:59+5:30
Nagpur News मागील महिन्याभरापासून नाग नदीत मगर दिसल्याबाबत बरेच दावे व अफवांना ऊत आला होता. अखेर शहरात खरोखरच मगर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर : मागील महिन्याभरापासून नाग नदीत मगर दिसल्याबाबत बरेच दावे व अफवांना ऊत आला होता. अखेर शहरात खरोखरच मगर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच मगर प्रत्यक्षरित्या दिसली व त्यानंतर युद्धस्तरावर मगरीला पकडण्यासाठी व्यूहरचना ठरविण्यात आली. विशिष्ट क्षेत्रात मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले आहेत व दिवसभर वनविभागाची चमू नदीच्या काठी निरीक्षण करत होती. दुसरीकडे नदीच्या प्रवाहात कुणीही उतरू नये या आशयाचे फलक संबंधित भागात वनविभागातर्फे लावण्यात आले आहेत.
१३ नोव्हेंबर रोजी पत्रकार सहनिवासाच्या मागे नाल्याच्या स्वरुपात वाहणाऱ्या नाग नदीत पहिल्यांदा मगर स्थानिक नागरिकांना दिसली होती. यानंतर मगरीची छायाचित्रे व व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. वनविभागाच्या चमूला एकदाही मगर दिसली नव्हती. पंधरा दिवस अगोदर मोक्षधाम जवळ देखील एका व्यक्तीने नदीच्या प्रवाहात मगर दिसल्याचा दावा केला होता. परंतु शोध पथकाला काहीच आढळले नव्हते. आता संबंधित चमूला प्रत्यक्ष मगर दिसल्याने दावे खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराजबागच्या पाठीमागील भागात मगर दिसल्यानंतर पिंजरे लावण्यात आले आहे, असे नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ.भारतसिंह हाडा यांनी स्पष्ट केले.
मगर आली तरी कुठून ?
सूचना मिळाल्यावर तातडीने शोध पथक घटनास्थळी पोहोचत आहे. परंतु एकदाही मगर दिसली नव्हती. आता मगर नेमकी आली कुठून हा प्रश्न उपस्थित होत आहे. काही काळाअगोदर मगरीच्या पिल्लाला कुठूनतरी आणल्यानंतर एखाद्या व्यक्तीने उगाच अडचण नको म्हणून नाग नदीच्या प्रवाहात त्याला सोडले असेल. तीच मगर आता मोठी होऊन प्रवाहात दिसत आहे, अशी शक्यता आहे. नदी किंवा नाला हे मगरीचे मूळ अधिवास नाही. त्यामुळे मगरीला पकडून मूळ अधिवासात रवानगी करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे डॉ. भारतसिंह हाडा यांनी सांगितले.