नागपूरच्या संस्थापकाची समाधी ढाळतेय भग्नावस्थेचे अश्रू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:08 AM2021-07-30T04:08:09+5:302021-07-30T04:08:09+5:30
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘जन पळभर म्हणतील हाय हाय...’ सामान्य माणसांच्या अस्तित्वाचा अर्थ मांडणारी ही ...
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘जन पळभर म्हणतील हाय हाय...’ सामान्य माणसांच्या अस्तित्वाचा अर्थ मांडणारी ही कविता. पण ते सामान्य नव्हते. उपराजधानी म्हणून गाैरव करताे त्या नागपूरच्या संस्थापक राजाची ही व्यथा आहे. भोसले-औरंगजेब-गोंडराजे यांच्यातील धुमश्चक्रीदरम्यान सुमारे ३०० वर्षापूर्वी नागपूरची उभारणी करणाऱ्या गोंडराजे बख्त बुलंद शहा व त्यांच्या वंशजांचे समाधीस्थळ भग्नावस्थेचे अश्रू ढाळत आहे. समाधी स्थळांना जागाेजागी खिंडार पडले आहे व संपूर्ण परिसर झाडेझुडपे-गवतांनी व्यापला आहे. वर्तमान राजकारणी, शासन-प्रशासन व नागरिकांच्याही उदासीनतेमुळे इतिहासच पुसला जाण्याची भीती आहे.
तिरंगा चौक ते सक्करदरा पोलीस ठाण्यादरम्यान उजव्या हाताला ही समाधी कोणाच्याही नजरेस पडत नाही, इतकी दयनीय अवस्था या स्थळाची आहे. इतिहासातील नोंदीनुसार या गोंड राजघाटाचे क्षेत्रफळ पाच एकर इतके होते. मात्र, कालांतराने या क्षेत्रावर अतिक्रमण होत गेले. तेथे घरे, दुकाने आदी बनले असून, त्यांची विधिवत रजिस्ट्रीही असल्याचे सांगितले जाते. आदिवासी जमीन हक्क कायद्यांतर्गत आदिवासींची जमीन बळकावता येत नाही. असे असतानाही झालेले कायदेशीर अतिक्रमण प्रशासनातील गौडबंगालाचा संशय निर्माण करते. विशेष म्हणजे, ऐतिहासिक वारसा असल्याचे भानही कुणाला राहिले नाही.
या स्थळावर सद्यस्थितीत गोंड राजघराण्यातील वंशजांच्या १९ समाधी अस्तित्त्वात आहेत. मात्र, झाडाझुडपे व गवतांनी व्यापल्या असल्याने नजरेस केवळ तीन-चारच पडतात.
-----------------
समाधीस्थळ विकासाचा प्रस्ताव पडून
या परिसराच्या विकासाचा प्रस्ताव नगरसेविका दिव्या धुरडे यांनी वर्षभरापूर्वी दिला होता. मात्र, मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही. समाधीस्थळाला अतिक्रमणापासून संरक्षण देण्यासाठी संरक्षण भिंत, समाधीची डागडुजी, प्रवेश गेट, ई-म्युझियम व परिसरातील विकासकामे यासाठी १ कोटी ६८ लाख रुपयाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, त्याला मंजुरीच मिळाली नाही, इतकी अनास्था ऐतिहासिक वारसा स्थळाविषयी मनपाची दिसून येते. दरम्यान ७ मार्च २०२१ रोजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी समाधीस्थळाची पाहणी केल्यावर डागडुजी व नुतनीकरणासंदर्भात हेरिटेज समितीकडे प्रस्ताव पाठवून समितीच्या निर्धारित वास्तू शिल्पकाराकडून प्रस्ताव तयार करून अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे निर्देश दिले होते.
----------------
राजघाटाचा दर्जा द्या
गोंडराजा बख्त बुलंद शहा यांच्यासह त्यांच्या वंशजांच्या समाधी येथे आहेत. नागपूरची उभारणी करणारा हा राजा इतिहासातून असा वगळला जावा आणि त्याच राजघराण्याविषयी अनास्था व्यक्त व्हावी, इतकी कृतघ्नता शासन-प्रशासन व राज्यकर्त्यांकडून होत आहे. हा ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे जतन व्हावे आणि गोंडराजांचा इतिहास मुलांना कळावा म्हणून तो शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.
- दिनेश शेराम - अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नागपूर विभाग व सिनेट सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ