नागपुरात शिवसेनेचे चार वर्षात चार संपर्कप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:23 AM2018-08-11T11:23:26+5:302018-08-11T11:25:41+5:30

शिवसेनेने गेल्या चार वर्षात नागपूर व पूर्व विदर्भासाठी चार संपर्क प्रमुख बदलले आहे. नवा संपर्क प्रमुख देताना संबंधित नेता आता स्थायी स्वरुपात या भागाकडे शिवसेना वाढविण्यासाठी विशेष लक्ष देईल, असा दावा केला जात होता. मात्र, चार सहा महिन्यांतच संबंधिताला संपर्कक्षेत्र सोडावे लागले.

In Nagpur four years of Shiv Sena's four chiefs | नागपुरात शिवसेनेचे चार वर्षात चार संपर्कप्रमुख

नागपुरात शिवसेनेचे चार वर्षात चार संपर्कप्रमुख

Next
ठळक मुद्देगजानन कीर्तीकर सांभाळणार पूर्व विदर्भशिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल का ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेने गेल्या चार वर्षात नागपूर व पूर्व विदर्भासाठी चार संपर्क प्रमुख बदलले आहे. नवा संपर्क प्रमुख देताना संबंधित नेता आता स्थायी स्वरुपात या भागाकडे शिवसेना वाढविण्यासाठी विशेष लक्ष देईल, असा दावा केला जात होता. मात्र, चार सहा महिन्यांतच संबंधिताला संपर्कक्षेत्र सोडावे लागले. आता खासदार गजानन कीर्तीकर यांच्याकडे पूर्व विदभार्साठी संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुंबईतील नेते विदर्भाकडे विशेष लक्ष देत नाहीत, रिक्त पदे त्वरित भरत नाहीत, अशी येथील कार्यकर्त्यांची नाराजी आहे. गेल्या चार वर्षातील पूर्व विदर्भाचा घटनाक्रम पाहता एकाही संपर्क प्रमुखाला येथे स्थिरावता आलेले नाही. पूर्व विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख विनायक राऊत होते. ते रायगडमधून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी संपर्क प्रमुखपद सोडले. त्यांच्या जागी आमदार अनिल परब यांची नियुक्ती केली होती. परब यांच्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविल्यानंतर आ. तानाजी सावंत यांच्यावर धुरा देण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा मेळावा घेत सावंत यांनी रणशिंग फुकले, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी ते नागपुरात फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कार्यकर्त्यांची नाराजी वाढली होती. त्यांना बदलून काही महिन्यांपूर्वीच अनुभवी नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.
रावते यांनी या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जिल्ह्यांचे दौरे केले. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.
जवळचा दूरचा भेदभाव न करता चुकेल त्याची कानउघाडणीही केली. मात्र, रावते हे मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर इतरही कामांचा भार होता. आगामी निवडणुका विचारात घेता आता पक्षाने रावते यांच्यावर कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा व सांगलीची संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली व पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी कीर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कीर्तीकरांची नियुक्ती
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती लढली. विधानसभेत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. सध्या शिवसेनेचे पूर्व विदर्भात एक खासदार व एकच आमदार आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा सेनेकडून वारंवार केली जात आहे.या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात संघटन मजबूत करण्यासाठी कीर्तीकर यांच्यावर धुरा सोपविण्यात आल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. कीर्तीकर हे यापूर्वी १९९४ पासून ९ वर्षे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख होते. त्यांच्या काळात नागपूर जिल्हा परिषदेत दोन सदस्य असतानाही शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले होते. लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षाला त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

नागपूर शहर कार्यकारिणी कुठे अडली ?
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेखर सावरबांधे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून आजवर पक्षाची नवी शहर कार्यकारिणी स्थापन झालेली नाही. सावरबांधे यांच्यानंततर सतीश हरडे व काही महिन्यांपूर्वी माजी खासदार प्रकाश जाधव नागपूर शहर अध्यक्ष झाले. मात्र, कुणीही कार्यकारिणी देऊ शकले नाही. विशेष म्हणजे पक्ष विना कार्यकारिणीने महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेला व दारुण पराभव पहावा लागला. मुंबईत बसणाऱ्या नेत्यांना पदे हवी आहेत, तर नागपुरात राबणाऱ्या कार्यकर्त्यांना का नाही, असा सवाल कार्यकर्ते करू लागले आहेत. किर्तीकर हे पुढच्या आठवड्यात नागपुरात येत असून पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. चार वर्षात झाले नाही ते किर्तीकर तरी करतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

Web Title: In Nagpur four years of Shiv Sena's four chiefs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.