Nagpur: तथाकथित पत्रकाराकडून शेती नावावर करून देण्याच्या नावाखाली फसवणूक  

By योगेश पांडे | Published: March 22, 2024 10:24 PM2024-03-22T22:24:17+5:302024-03-22T22:24:57+5:30

Nagpur News: वडिलोपार्जित शेती व प्लॉट नावावर करून देण्याची बतावणी करत एका तथाकथित पत्रकाराने सावनेरच्या तरुणाची ४.७० लाखांनी फसवणूक केली. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Nagpur: Fraud by a so-called journalist in the name of farming | Nagpur: तथाकथित पत्रकाराकडून शेती नावावर करून देण्याच्या नावाखाली फसवणूक  

Nagpur: तथाकथित पत्रकाराकडून शेती नावावर करून देण्याच्या नावाखाली फसवणूक  

नागपूर - वडिलोपार्जित शेती व प्लॉट नावावर करून देण्याची बतावणी करत एका तथाकथित पत्रकाराने सावनेरच्या तरुणाची ४.७० लाखांनी फसवणूक केली. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

विवेक विठ्ठलराव धारट (३५, नक्षत्र कॉलनी, वॉर्ड क्रमांक पाच, सावनेर) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांची मौजा दहेगाव येथे वडिलोपार्जित शेती व प्लॉट आहे. तक्रारीनुसार वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आत्याने ती एकटीच वारसदार असल्याचा दावा करत परस्पर शेती व प्लॉट स्वत:च्या नावावर करून घेतली. याबाबत विवेक यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांना याबाबतची बातमी एखाद्या चॅनल किंवा वर्तमानपत्रात प्रकाशित व्हावी असे वाटत होते. त्यांना कुणीतरी कुठलीही मान्यता नसलेल्या महाराष्ट्र न्यूज २४ या तथाकथित यूट्यूब चॅनलचा पत्रकार रितेश बोरकर याच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यांनी रितेशच्या सीताबर्डी येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. माझी सिटीसर्व्हे कार्यालयात ओळख आहे. तुमचे काम मी सहज करून देईल, अशी बतावणी रितेशने केली. या कामासाठी वकील व इतर खर्चापोटी रितेशने धारट यांना पाच लाखांची मागणी केली.

शेती व प्लॉट मिळतील या विचाराने धारट यांनी रितेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व त्याला २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२३ या कालावधीत रोख, ऑनलाइन व युपीआयच्या माध्यमातून ४.७० लाख रुपये दिले. मात्र रितेशने कुठलेही काम केले नाही. प्रत्येकवेळी विचारणा केल्यावर रितेश काही तरी कारण सांगून टाळाटाळ करायचा. पाच महिने झाल्यावरदेखील काहीच काम होत नसल्याचे पाहून धारट यांना संशय आला. त्यांनी रितेशची भेट घेत त्याला पैसे मागितले. मात्र त्याने पैसे परत न करता परत कारणे देण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे धारट यांच्या लक्षात आले. त्यांनी २१ मार्च रोजी त्याच्याविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रितेशविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nagpur: Fraud by a so-called journalist in the name of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.