नागपुरात केवळ एका सिग्नलवर तब्बल दीड लाख रुपयाचे इंधन जाते वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:22 AM2020-07-01T11:22:35+5:302020-07-01T11:35:50+5:30
नागपुरात केवळ एका चौकात रेड सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रति तास १लाख ४९ हजार ४७५ रुपयाचे इंधन वाया जाते.
सैयद मोबीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चौकाचौकांमध्ये सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे वेळेचे आणि इंधनाचेही नुकसान होते. शिवाय, पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. या संदर्भात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआयटी)च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात आश्चर्यचकित करणारे आकडे पुढे आले आहेत. केवळ एका चौकात रेड सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रति तास १लाख ४९ हजार ४७५ रुपयाचे इंधन वाया जाते. या अनुषंगाने विचार केल्यास दरवर्षी हे नुकसान १३० कोटी ९४ लाख २ हजार ५६८ रुपये इतके होते.
व्हीएनआयटीच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. विश्रुत लांडगे यांच्या मार्गदर्शनात अभिषेक कुमार सिंह, सौरभ पंजाबी, प्राजक्ता देव व शौनक झुलकंठीवार या विद्यार्थ्यांनी रविनगर चौकातील निरीक्षणानुसार आपले आकडे सादर केले. जुलै २०१९ ते मार्च २०२० या काळात केलेल्या या अभ्यासात सकाळी व संध्याकाळी अत्यंत घाईगडबडीच्या वेळेची निवड करण्यात आली होती. नागपूर शहरात ही वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ व संध्याकाळी दुपारी ४.३० ते ७.३० वाजताची आहे. त्याअनुषंगाने सिग्नलवर वाहने थांबल्यामुळे खर्च होणारा वेळ, इंधनासह पर्यावरणाला होणारे नुकसान मोजण्यात आले. अभ्यासात सर्वात जास्त नुकसान वेळेचे दिसून आले. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर इंधन आणि तिसऱ्या क्रमांकावर पर्यावरणाचे नुकसान आले. ही आकडेवारी शहरातील एका चौकाची आहे. जर सर्व लहान मोठ्या चौकांचे निरीक्षण केल्यास ही आकडेवारी विस्मयकारी ठरण्याची शक्यता आहे.
वाहनांची वाढती संख्या हे प्रमुख कारण
: चौकांमध्ये सिग्नलवर थांबल्यावर वेळ, इंधन आणि पर्यावरणाचे होणाऱ्या नुकसानीचे प्रमुख कारण वाहनांची वाढती संख्या आहे. उड्डाण पुलांची संख्या वाढवण्यात आली तर होणारे हे नुकसान बऱ्यापैकी कमी होऊ शकते. हे अशाप्रकारचे निरीक्षण संशोधन अन्य सिग्नलवरही केले जाईल. खरे तर हा अभ्यास जून २०२० पर्यंत करण्यात येणार होता. मात्र, टाळेबंदीमुळे मार्चमध्येच पूर्ण करण्यात आल्याची माहिती डॉ. विश्रुत लांडगे यांनी दिली.