जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 10:36 AM2022-06-03T10:36:25+5:302022-06-03T10:59:16+5:30
या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शेकडो बनावट आधार व रेशनकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
नागपूर : गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर ‘स्युअरिटी’ (बाँड) तयार करण्यासाठी बोगस दस्तावेज वापरणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडाफोड केला आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू होता व या माध्यमातून थेट न्यायव्यवस्थेचीच फसवणूक करण्यात येत होती. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शेकडो बनावट आधार व रेशनकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर ‘स्युअरिटी’ तयार करावे लागते. अशा गुन्हेगारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोणीही ‘स्युअरिटी’बनवून देण्यासाठी आपले दस्तावेज देत नाही. अशाच गुन्हेगारांकडून हजारो रुपये वसूल करून ही टोळी बनावट आधार कार्ड, बनावट रेशन कार्ड, बनावट घर टॅक्स पावती बनवून द्यायची. जामीन मिळालेले गुन्हेगार याच बनावट दस्तावेजांच्या आधारे ‘स्युअरिटी’ तयार करून न्यायालयात सादर करायचे.
गुन्हे शाखेला याची ‘टीप’ मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. न्यायालयासमोर एका चारचाकी गाडीत हा प्रकार सुरू असताना धडक कारवाई करण्यात आली व सुनील सोनकुसरे, सतीश शाहू या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अडीचशेहून अधिक बनावट आधार कार्ड, १०६ बनावट रेशन कार्ड, ‘सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट’ एक हजारपेक्षा जास्त पासपोर्ट फोटो, लॅपटॉप, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, असे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्या टोळीत आणखी कोण लोक आहेत, त्याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
न्यायव्यवस्थेचीच फसवणूक करण्याचा प्रकार
सोनकुसरे आणि शाहू यांच्याकडून गेल्या सहा वर्षांपासून असा गोरखधंदा सुरू होता. बनावट दस्तावेजांचा आधार घेत शेकडो गुन्हेगारांनी ‘स्युअरिटी’ तयार केल्याची शक्यता आहे.
अशी होती ‘मोडस ऑपरेंडी’
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोरच एका चारचाकी वाहनात बसून बनावट दस्तावेज तयार करून देण्याचा हा गोरखधंदा या टोळीकडून चालविण्यात येत होता. या टोळीकडून फोटोशॉपच्या माध्यमातून बोगस आधारकार्ड तयार करण्यात यायचे. याशिवाय याच पद्धतीने रेशनकार्ड व इतर दस्तावेजदेखील तयार व्हायचे. अनेक आधार कार्डवर फोटो तर एकाच माणसाचा होता. परंतु नाव व आधार क्रमांक वेगवेगळा असल्याचेदेखील दिसून आले. सोबतच लगेच ऑनलाइन प्रक्रियेत उभे राहून दस्तावेज तयार करून घेण्यासाठी या टोळीचे अनेक हस्तकही तयार असायचे. त्यांचादेखील शोध घेण्यात येत आहे.