नागपुरातील गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीत संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:03 PM2018-10-24T23:03:41+5:302018-10-24T23:07:42+5:30
जरीपटक्यातील एका गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीच्या चांदूर बाजार रेल्वे ट्रॅक येथे संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी पहाटे रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला. अमरावती पोलीस तपास करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील एका गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीच्या चांदूर बाजार रेल्वे ट्रॅक येथे संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी पहाटे रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला. अमरावती पोलीस तपास करीत आहेत. कपिल देव झामानी (३४) रा. दयालू सोसायटी जरीपटका असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. कपिल यांचे कमाल चौकात समाधा गारमेंट नावाचे दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार कपिल मागील काही दिवसांपासून त्रस्त होता. तीन दिवसांपूर्वी तो घरून बाहेर पडला. तेव्हापासून त्याचा काही पत्ता नाही. सुरुवातीला कुटुंबीयांना वाटले की, दिवाळीच्या खरेदीसाठी तो बाहेर गेला असावा. संपर्क केल्यावर त्याचा मोबाईल ‘स्वीच आॅफ’ असल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. बुधवारी पहाटे चांदूर बाजार रेल्वे ट्रॅकजवळ कपिलचा मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. अमरावती पोेलिसांनी कपिलच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय अमरावतीला पोहोचले. पोस्टमार्टेमनंतर कपिलच्या मृतदेहासह कुटुंबीय बुधवारी सायंकाळी नागपूरला पोहोचले.
कपिलने आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही विपरीत घडले, याबाबत चांदूर बाजार रेल्वे पोलीस सध्याच काही सांगण्याच्या स्थितीत नाही. तपास सुरू आहे. कपिलचा गारमेंंटचा व्यवसायही चांगला सुरू होता. त्याचे कुटुंबीयसुद्धा सामान्य घरातील आहेत. त्याचे कुटुंबीय अनेक वर्षांपूर्वीच नागपुरात राहताहेत. कुटुंबात पत्नी, मुलगा-मुलगी, दोन भाऊ आणि आई-वडील आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का पोहोचला आहे.