वाहन चालवताना डुलकी लागताच 'हे' डिव्हाइस देणार आलार्म; अपघात रोखण्यास मिळणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 03:59 PM2022-02-18T15:59:38+5:302022-02-18T16:16:13+5:30
गाडी चालवताना चालकाची मान स्टिरिंगकडे ३० डिग्री वाकताच हे उपकरण लगेच आलार्म वाजवून अलर्ट करेल.
नागपूर : वाहन चालविताना अचानक लागलेली डुलकी मोठ्या अपघाताच कारण ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील एका चालकाने एक असे उपकरण तयार केले असून त्या माध्यमातून रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करता येऊ शकते. वाहन चालवताना चालकाचा डोळा/डुलकी लागताच हे उपकरण लगेच अलर्ट करणार आहे.
नागपुरातील एका चालकाने हे उपकरण तयार केले आहे. हे लहानसं उपकरण मोठ्या कामाचं आहे. याला कानामागे बसवता येते. यात एक सेंसर, ३.६ व्होल्ट ची बॅटरी आणि एक ऑन-ऑफ स्विच लागला आहे. गाडी चालवताना चालकाची मान स्टिरिंगकडे ३० डिग्री वाकताच हे उपकरण लगेच आलार्म वाजवून अलर्ट करेल.
हे उपकरण बनविण्यामागचे कारण सांगताना गौरवने त्याचा अनुभव सांगितला. एकदा गाडी चालवताना त्याला अचानक डुलकी लागली पण सुदैवाने वेळीच भानावर आल्याने अपघात होता-होता टळला. या घटनेनंतर त्याने यावर उपाय शोधण्याचे ठरवले व त्यातूनच हे उपकरण तयार करण्याची कल्पना सुचल्याचे गौरव म्हणाला.
हे छोटेसे उपकरण मोठ्या कामाचे असून यामुळे, रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना चालकांना मोठी मदत मिळेल. व अपघातांचे प्रमाणही कमी करण्यास हे उपकरण उपयोगी ठरेल.