नागपूरला मिळाल्या ६१ हजार नवीन लसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 08:48 PM2021-05-06T20:48:21+5:302021-05-06T20:53:36+5:30

Nagpur gets new vaccines जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. लसीकरणाला गती आली असून, पुढील काळात आणखी लसी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Nagpur gets 61,000 new vaccines | नागपूरला मिळाल्या ६१ हजार नवीन लसी

नागपूरला मिळाल्या ६१ हजार नवीन लसी

Next
ठळक मुद्दे४५ हजार कोव्हिशिल्ड ज्येष्ठांसाठी १६ हजार कोव्हॅक्सिन तरुणांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. लसीकरणाला गती आली असून, पुढील काळात आणखी लसी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुरुवारी पुन्हा चार टँकर वायुदलाच्या विशेष विमानाने ओदिशा राज्यातील अंगूळ येथील स्टील प्लांटला रवाना करण्यात आले. बुधवारी पाठविण्यात आलेले चार ऑक्सिजन टँकर शुक्रवारी सायंकाळपर्यंत नागपूर शहरात पोहोचण्याची अपेक्षा आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा गती मिळाली असून, बुधवारी रात्रीपर्यंत ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ४५ हजार कोव्हिशिल्ड, तर १६ हजार कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. नव्याने प्राप्त झालेल्या १६ हजार कोव्हॅक्सिनमधून ग्रामीण भागातील सावनेर, कामठी येथील केंद्रांवर तर नागपूर शहरातील महाल, छापरू स्कूल, मानेवाडा यूपीएससी या केंद्रांवर १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण केले जात आहे. अन्य ४५ हजार लसींच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

पुन्हा ४ टॅंकर विमानाने रवाना

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता ओदिशा राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी चार टँकर एअरफोर्सच्या विमानाने रवाना झाले होते. गुरुवारी पुन्हा चार टँकर सायंकाळी सात वाजता रवाना झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ओदिशा राज्यातील भुवनेश्वर नजीकच्या अंगूळ येथील स्टील प्लांटमधून नागपूरसाठी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. नागपूरला शुक्रवारी सायंकाळपर्यंत चार टँकर रस्ते मार्गाने पोहोचणार असून, शुक्रवारी पाठविण्यात आलेले टँकर शनिवारपर्यंत पोहोचतील.

४,४८५ रेमडेसिविरचे वितरण

जिल्ह्यात गुरुवारी एकूण ४,४८५ रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध झाले. शहरातील १५६ तर ग्रामीणमधील ४९ शासकीय व खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचे वाटप करण्यात आले. अन्न, औषध व प्रशासन, यांचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी वितरण तक्त्यानुसार वाटप होत असल्याची खातरजमा करण्यात येत आहे. कोविड-१९ वैश्विक साथीमध्ये काम करणारे फ्रंटलाइन वर्कर्स उदाहरणार्थ आरोग्य सेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन, परिवहन इत्यादी विविध आस्थापनांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी १० टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश असल्याने त्यांना प्राधान्याने रेमडेसिविर देण्यात येते.

गुरुवारी टॉसिलीझुमॅब प्राप्त झालेले नाही. बुधवारपर्यंत १०५ डोसेस प्राप्त झाले होते. त्याचे नियमित वितरण करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

१०६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त

६ मे रोजी जिल्ह्यात १०६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. जिल्ह्यात भिलाई, रायपूर, नागपूर, येथील ऑक्सिजन फिलिंग सेंटरवरून ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील जगदंबा, भरतीया, आदित्य, आसी, रुक्मिणी या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटमधून १३८ मेट्रिक टनाची क्षमता आहे. त्यापैकी गुरुवारी ७६ मेट्रिक टनची गरज असून, ५२ मेट्रिक टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे, तर मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे, लता मंगेशकर हॉस्पिटल, ॲलेक्सिस हॉस्पिटल, अवंती, क्रिम्स, ऑरेंजसिटी, शुअर टेक, वोक्हार्ट, आशा हॉस्पिटल कामठी, ७१ मेट्रिक टनची गरज असताना ८० मेट्रिक टन ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे. अशारीतीने आवश्यक ऑक्सिजन वितरण आज झाले आहे. तर चंद्रपूर, वर्धा, भंडारा, सावंगी, छिंदवाडा, अकोला आदी ठिकाणीदेखील आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

असा झाला ऑक्सिजन पुरवठा

१ मे - ९३ मेट्रिक टन

२ मे - २२० मेट्रिक टन

३ मे- १११ मेट्रिक टन

४ मे- ६० मेट्रिक टन

५ मे- ११८ मेट्रिक टन

६ मे- १०६ मेट्रिक टन

Web Title: Nagpur gets 61,000 new vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.