नागपुरात ‘पीओपी’च्या गणेश मूर्तींनी गोडावून फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:28 PM2018-08-20T16:28:03+5:302018-08-20T16:38:10+5:30
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी नाही. पण, विक्री करायची असल्यास महानगरपालिकेचे नियम आहेत. हे नियम धाब्यावर बसवून चितार ओळीत पीओपी मूर्तींच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ‘लोकमत’ चमूने रविवारी ग्राहक बनून या भागाला भेट दिली असता, अनेक दुकानदारांनी अशा मूर्तींचे गोडावूनच उघडे करून दाखविले. या भागात २५वर असे गोडावून आहेत ज्यात पीओपीच्या मूर्ती साठवून ठेवल्या आहेत. यात रोज बाहेरून येणाऱ्या हजारो ‘पीओपीं’च्या मूर्तींची भर पडत आहे. गणेशोत्सवात या सर्व मूर्ती शाडू मातीच्या नावाने ग्राहकांच्या माथी मारल्या जाणार असल्याचे वास्तव आहे.
सुमेध वाघमारे/संजय लचुरीया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी नाही. पण, विक्री करायची असल्यास महानगरपालिकेचे नियम आहेत. हे नियम धाब्यावर बसवून चितार ओळीत पीओपी मूर्तींच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ‘लोकमत’ चमूने रविवारी ग्राहक बनून या भागाला भेट दिली असता, अनेक दुकानदारांनी अशा मूर्तींचे गोडावूनच उघडे करून दाखविले. या भागात २५वर असे गोडावून आहेत ज्यात पीओपीच्या मूर्ती साठवून ठेवल्या आहेत. यात रोज बाहेरून येणाऱ्या हजारो ‘पीओपीं’च्या मूर्तींची भर पडत आहे. गणेशोत्सवात या सर्व मूर्ती शाडू मातीच्या नावाने ग्राहकांच्या माथी मारल्या जाणार असल्याचे वास्तव आहे.
आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन २५ दिवसांवर येऊन ठेपले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जय्यत तयारी सुरू झाली आहे. लहानमोठी गणेश मूर्तींची दुकाने बाजारात सजू लागली आहेत. मूर्तिकार श्रींच्या मूर्तीवरून अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. लवकरच ‘इको फ्रेंडली’ (पर्यावरणाशी सुसंगत) गणेश मूर्तीच्या नावाने चर्चेला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी ‘लोकमत’ चमूने पीओपीच्या गणेश मूर्तींचा मागोवा घेतला असता अनेक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात एकीकडे अविघटन कचरा म्हणून प्लास्टिकवर बंदी आणली असताना ‘पीओपी’च्या हजारो मूर्ती बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. केवळ चितारओळीतच नाही तर भावसार चौक, सदर, गोकुळपेठ, सक्करदरा, मानेवाडा, लक्ष्मीनगर, प्रतापनगर आदी भागात काही इंचाच्या मूर्र्तींपासून ते सहा फुटांच्या मूर्तींनी गोडावून व्यापल्याचे चमूला दिसून आले.
रोज दोन ट्रक पीओपी मूर्तींची विक्री
‘लोकमत’ चमूने स्वत:ला ग्राहक सांगून एका मूर्ती व्यापाराला बोलते केले असता त्याने सांगितले, पूर्वी नागपूर शहर व आजूबाजूचे गणेश मूर्ती विक्रेता पीओपीच्या मूर्ती खरेदीसाठी अमरावती, आष्टी, आर्वी, यवतमाळ, वर्धा, वाशीम येथे जायचे. परंतु आता तेथील व्यापारीच पीओपींच्या मूर्तींची रोज दोन-तीन ट्रक नागपुरात आणून विक्री करीत आहे. या मूर्ती जर खरेदी करायचे असेल तर रात्री येण्याचा सल्लाही त्या व्यापाऱ्याने दिला.
मातीच्या नावावर पीओपीची मूर्ती
लोकमत चमूने चितारओळीतील ‘श्रीकांत’ नावाच्या विक्रेत्याला दहा गणेश मूर्तीची आॅर्डर द्यायची असे सांगताच त्याने दुकानात उपलब्ध मूर्र्तींसोबतच भरगच्च भरलेले दोन गोडावून उघडूनही दाखविले. ‘पीओपी’च्या तयार असलेला या मूर्ती काळ्या मातीची असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
मनपाचा नियमांची पायमल्ली
पीओपी मूर्तींची विक्री करायची असल्यास महानगरपालिकेने काही नियम घालून दिले आहेत. यात पीओपीची मूर्ती विकण्यासाठी मनपाची परवानगी घेणे, विक्रीच्या ठिकाणी ‘पीओपी’ मूर्ती असल्याचे फलक लावणे, मूर्तीच्या मागे लाल खूण करणे, विक्री करताना पावती देणे अनिवार्य आहे. परंतु चितारओळीत सुरू झालेल्या ‘पीओपी’ गणेशमूर्तीच्या विक्रेत्याकडे परवानगी नाही. ‘पीओपी’ची मूर्ती दिसत असताना मातीची मूर्ती सांगितले जात असल्याने एकाही मूर्तीच्या मागे लाल खूण नाही.
शासनाने कठोर निर्णय घेणे आवश्यक
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान विसर्जनानंतर या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे होणारे विद्रुपीकरण टाळण्यासाठी दरवर्षी जनजागृती केली जात असलीतरी ‘पीओपी’च्याच मूर्तींचीच सर्वाधिक विक्री होते. या मागील कारण उलगडून सांगताना मूर्तिकार मनोज म्हणाले, फार कमी मूर्तिकारांकडे स्वत:ची जागा असली तरी ती कमी आहे. भाड्याने घेतो म्हटले तरी त्याला मर्यादा आहे. यामुळे घरगुती मूर्ती फार कमी तयार होतात. परिणामी, मागणीच्या तुलनेत मातीच्या मूर्तीचे उत्पादनच कमी होते. दुसरे म्हणजे पीओपीच्या मूर्ती आकर्षक दिसतात व स्वस्तही पडतात. यातच काही व्यापारी पीओपीच्या मूर्तीला शाडू किंवा काळ्या मातीची किंवा पीओपी व माती ‘मिक्स’ असल्याचे पटवून देतात. यामुळे शासनाने यावर कठोर निर्णय घेणे व मूर्तिकारांना सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.