प्रतिस्पर्धी गुंडांना धडा शिकवण्यासाठी सामूहिक बलात्काराचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:40 PM2021-05-13T23:40:55+5:302021-05-13T23:41:09+5:30
कुख्यात रामटेकेचे षडयंत्र उघड; पोलिसांनी केली अटक
नागपूर : प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना धडा शिकवण्यासाठी सामूहिक बलात्काराचा गुन्हा घडवून आणणारा कुख्यात रोहित रामटेके याला अजनी पोलिसांनी अटक केली.
अजनीतील एका एका अल्पवयीन मुलीने गेल्या महिन्यात कुख्यात गुंड दत्तू खाटीक, अनिल लोखंडे, प्रतिक रोडे आणि वाघमारे नामक गुंडाने सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात पोलिसांनी तसा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती.
दरम्यान, पुढच्या चौकशीत तक्रार करणाऱ्या मुलीसोबत जी तरुणी होती, ती रोहित रामटेकेच्या सलग संपर्कात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता रोहित रामटेके याने त्याचा प्रतिस्पर्धी गुंड खाटीक तसेच साथीदारांना धडा शिकविण्यासाठी हा सामूहिक बलात्काराचा गुन्हा जाणीवपूर्वक घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. उपरोक्त आरोपींनी रामटेकविरुद्ध तीन महिन्यांपूर्वी असाच एक सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी रामटेकेने हा गुन्हा घडवून आणल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक करून गुरुवारी अजनी पोलिसांनी कारागृहात डांबले.