नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेसिडेंट डॉक्टरवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 10:08 PM2022-11-30T22:08:29+5:302022-11-30T22:10:05+5:30
Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टरवर ३० ते ३५ अज्ञात तरुणांनी हल्ला केला. यात संबंधित डॉक्टर जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीचीदेखील तोडफोड करण्यात आली.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टरवर ३० ते ३५ अज्ञात तरुणांनी हल्ला केला. यात संबंधित डॉक्टर जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीचीदेखील तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ माजली होती.
डॉ. गोपाल हरीभाऊ जंगले (२९) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून ते त्यांच्या मित्रासोबत राहात असून, कम्युनिटी मेडिसिन्समध्ये काम करतात. मंगळवारी रात्री ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिमखान्यात व्यायाम करण्यासाठी गेले होते. व्यायाम करून झाल्यावर ते तेथून बाहेर पडले व वसतिगृहाकडे जाण्यासाठी दुचाकी काढायला लागले. यावेळी अचानक तोंडाला रुमाल बांधलेल्या ३० ते ३५ अज्ञात तरुणांनी त्यांना घेरले व शिवीगाळ करू लागले. या प्रकारामुळे डॉ. जंगले धास्तावले. तरुणांनी त्यांना थेट मारहाण करायला सुरुवात केली व दगडानेदेखील मारणे सुरू केले.
डाॅ. जंगले यांच्या डोक्याला व ओठाला मार लागला व रक्त निघू लागले. डॉ. जंगले यांनी आरडाओरड केली व त्यानंतर लगेच सर्व आरोपी पळून गेले. मात्र, जाताना त्यांनी डाॅ. जंगले यांच्या दुचाकीचे नुकसान केले. प्राथमिक उपचार घेऊन डाॅ. जंगले यांनी अजनी पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. संबंधित तरुण बाहेरील होते की परिसरातीलच होते, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.