Nagpur Graduate Constituency; 'भदे'चे झाले 'भाडे', गुगल ट्रान्सलेटरमुळे बदलली मतदारांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 03:46 PM2020-11-27T15:46:04+5:302020-11-27T15:48:23+5:30
Nagpur News election नागपूर जिल्हा प्रशासनाची गुगल ट्रान्सलेशनने डोकेदुखी वाढविली आहे. नागपूर विभागातील मतदार यादी तयार करताना गुगलच्या भाषांतरामुळे अऩेक मतदारांच्या नावातच बदल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंग्रजीतून मराठी किंवा मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना गुगल भाषांतराचा (ट्रान्सलेटर) उपयोग करण्यात येतो. यामुळे काम सोपे होत असल्याचे सांगण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाची मात्र गुगल ट्रान्सलेशनने डोकेदुखी वाढविली आहे. मतदार यादी तयार करताना गुगलच्या भाषांतरामुळे अऩेक मतदारांच्या नावातच बदल केला आहे. उदाहरणार्थ ‘भदे’चे ‘भाडे’ असे आडनाव करण्यात आले. त्यामुळे मतदारांची नावे शोधण्यात अडचण होत असून अनेक जण मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
विधान परिषदेच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाची निवडणूक सुरू आहे. यंदा मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली. २ लाख ६ हजार मतदारांची नोंद झाली असून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत अनेक घोळ असल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्यात. एकाच कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळी मतदान केंद्र निश्चित करण्यात आलीत. त्याचप्रमाणे नावातही घोळ असल्याचे समोर आले आहे. नाव, आडनाव, वडिलांच्या नावात बदल असल्याचे सांगण्यात येते. इंग्रजीतील नाव व मराठीतील नावातही बदल आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदार यादी तयार करताना गुगल भाषांतरकचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे मराठी आणि इंग्रजीतील नावात बदल झाला. यामुळे इंग्रजी आणि मराठीच्या नावात तफावत आहे. यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ओळख पटवून मतदान करता येणार
मतदार यादीबाबतच्या काही तक्रारी आहेत. त्या तपासण्याच्या सूचना दिल्या. नावातील बदलकसंदर्भातील काही प्रकरणे समोर आली आहेत. नावात बदल असल्यास संबंधितांच्या नावाची खात्री करून मतदान करण्यास परवानगी देण्याच्या सूचना सर्व प्रिसायडिंग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.