रामटेकमध्ये शिवसेनेच्या जयस्वालांनी गाव राखले, मात्र कॉंग्रेसने मैदान मारले
By जितेंद्र ढवळे | Published: November 6, 2023 03:09 PM2023-11-06T15:09:11+5:302023-11-06T15:10:34+5:30
Nagpur Gram Panchayat Election Results : राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर आ.जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
नागपूर :नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात २८ ग्रा.पं.च्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस असा थेट सामना झाला. यात शिवसेनेचे आ.आशिष जयस्वाल यांचे मुळ गाव असलेल्या काचुरवाही ग्रा.पं.च्या सरपंचपदी शिवसेनेच्या सविता सुभाष नागोसे यांनी कॉंग्रेस समर्थित आघाडीचे किरण धीरज पानतावणे यांचा पराभव केला.
जयस्वाल यांनी गाव राखले असले तर रामटेक तालुक्यात कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात जोरदोर मुसंडी मारली आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर आ.जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र रामटेक तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीत मतदारांनी शिंदे यांच्या सेनेला नाकारल्याचे चित्र आहे. येथे महादुला ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे शरद डडुरे विजयी झाले. भंडारबोडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेच्या सुनिता रमेश मिसार, बोरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसच्या प्रेमलता राजेंद्र कंगाली, डोंगरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी मनिषा प्रमोद माकडे (कॉंग्रेस) तर बोथिया पालोरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसच्या छाया रोशन भट्टी विजयी झाल्या आहेत.
काट्याची टक्कर झालेल्या खैरी बिजेवाडा ग्रा.प.च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे रणवीर यादव विजयी झाले आहे. रणवीर कॉंग्रेस नेते उदयसिंग यादव यांचे धाकटे बंधू आहेत. खनोरा ग्रा.पं.च्या सरपंच पदी कॉंग्रेसच्या सरला तुळसीराम खंडाते, हिवराबाजार ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपा रत्नमाला राजेश जजस्वाल विजयी झाल्या तर सराखा बोर्डा ग्रा.पं.च्या सरपंचपदी अपक्ष तुळसीराम राऊत यांनी बाजी मारली.