दाव्यांचे रॉकेट, गावोगावी दिवाळी! महाविकास आघाडीला १६७ तर महायुतीला १५७ जागा
By जितेंद्र ढवळे | Published: November 7, 2023 11:20 AM2023-11-07T11:20:07+5:302023-11-07T11:21:10+5:30
जिल्ह्यात भाजपा नंबर १ : ३५७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर : बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेस-भाजपा फिफ्टी-फिफ्टी
जितेंद्र ढवळे
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत १३८ जागी दमदार विजय मिळवित भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला. भाजपपाठोपाठ काँग्रेस समर्थित गटाचे ११४ सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ५१, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १ तर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) २, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) १८ तर इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्यांचे ३३ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असा विचार करता जिल्ह्यात महाविकास आघाडीने १६७ तर महायुतीने १५७ ग्रा.पं.त विजय मिळविला आहे.
नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रा.पं.साठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या. यातील ४ अविरोध विजयी ठरल्या. रविवारी ३५७ ग्रा.पं.साठी बंपर मतदान झाले होते. सोमवारी तेराही तालुक्यात मतमोजणी झाली. यात बहुतांश मोठ्या ग्रा.पं. त भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना झाल्याचे पाहावयास मिळाले. निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दाव्यांचे रॉकेट सोडले असले तरी गावोगावी सोमवारी विजयोत्सवाची दिवाळी साजरी करण्यात आली.
३६१ पैकी २३७ ग्रा.पं.त भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. सदस्यपदाच्या ३,००५ जागांपैकी १,८२१ जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यातील ५ ग्रा.पं.च्या सरपंचपदाची निवड अविरोध झाली होती. यापैकी ४ सरपंच भाजपाचेच आहे. आजचा विजय महायुती सरकारने ग्रामीण भागात केलेल्या विकासकामांची पावती आहे.
- सुधाकर कोहळे, जिल्हाध्यक्ष, भाजपा, नागपूर (ग्रामीण)
ग्रा.पं. निवडणुकीत मतदारांनी महायुतीला नाकारले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे २२३ सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात काँग्रेसचे १३७, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ८४ तर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) दोन सरपंच विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मतदार जागा दाखवेल.
- राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस (नागपूर ग्रामीण)
बावनकुळेंच्या कामठीत काँग्रेस-भाजपा फिफ्टी-फिफ्टी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या कामठी तालुक्यात १० ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या. यात भाजप आणि काँग्रेस समर्थित गटाचे सरपंचपदाचे प्रत्येकी ५ उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यात भाजपाचा विजयरथ रोखण्यात काँग्रेस नेते सुरेश भोयर यांना काही अंशी यश आले.
रामटेकमध्ये शिवसेनेच्या जयस्वालांनी गाव राखले, मात्र काँग्रेसने मैदान मारले
रामटेक तालुक्यात २८ ग्रा.पं.च्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना झाला. यात शिवसेनेचे आ. आशिष जयस्वाल यांचे मूळ गाव असलेल्या काचूरवाही ग्रा.पं.च्या सरपंचपदी शिवसेनेच्या सविता सुभाष नागोसे यांनी काँग्रेस समर्थित आघाडीचे किरण धीरज पानतावणे यांचा पराभव केला.
जयस्वाल यांनी गाव राखले असले तर रामटेक तालुक्यात काँग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात जोरदोर मुसंडी मारली आहे. येथे काँग्रेसला १६, भाजपला २, शिवसेना (शिंदे गट)५, गोंडवाना १ आणि ४ ग्रा.पं.स्थानिक आघाडीचे सरपंच विजयी झाले.
गडकरींच्या धापेवाड्यात काँग्रेसचा गुलाल!
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा ग्रा.पं.च्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाच्या उमेदवार मंगला राजेश शेटे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजप समर्थित गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार निशा सुधाकर खडसे यांचा अवघ्या ६ मतांनी पराभव केला.
शेटे यांना २०११, तर तर खडसे यांना २००५ मते मिळाली. १७ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाचे १०, भाजप समर्थित गटाचे ६, तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
कळमेश्वर तालुक्यात २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात काँग्रेस समर्थित गटाचे १८, तर भाजप समर्थित गटाचे ३ सरपंच विजयी झाले आहेत. मात्र, धापेवाडा ग्रा.पं.च्या सरपंचपदाची निवडणूक चर्चेत राहिली. येथे आधी भाजपच्या निशा खडसे विजयी झाल्याचे जाहीर करीत त्यांच्या समर्थकांनी मतदार केंद्राबाहेर जल्लोष केला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतचा निकाल जाहीर केला नव्हता. यानंतर काँग्रेसकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. त्यामध्ये मंगला शेटे विजयी झाल्या. याही निवडणुकीत कळमेश्वर तालुक्यात मतदारांनी आ. सुनील केदार यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवल्याचे दिसून आले.