‘व्हायरल’ने उपराजधानी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:22 AM2019-09-10T11:22:34+5:302019-09-10T11:24:50+5:30

उपराजधानी व्हायरल तापाने फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह खासगी इस्पितळांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.

Nagpur in grip of 'Viral' | ‘व्हायरल’ने उपराजधानी बेजार

‘व्हायरल’ने उपराजधानी बेजार

googlenewsNext
ठळक मुद्देमेयो, मेडिकलसह खासगीमध्ये वाढले रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातावरणातील बदलांचा प्रभाव शरीरावर पडू लागला आहे. विशेषत: लहान मुले व वृद्ध व्हायरलचा म्हणजे विषाणूजन्य तापाच्या विळख्यात सापडत आहे. उपराजधानी व्हायरल तापाने फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह खासगी इस्पितळांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.
पावसाची उघडझाप, सततचे ढगाळ वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. तापासोबतच सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी अशा विविध कारणांनी लोक आजारी पडत आहेत. औषधोपचारासाठी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. यातच डेंग्यूसदृश आजाराच्या संख्येतही वाढ झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. मेडिकल आणि मेयो या शासकीय रुग्णालयात या आजाराचे दिवसाकाठी १५-२० रुग्ण येत आहेत. पाऊस लांबल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्हायरलसोबतच डेंग्यू, मलेरिया, कावीळ, अतिसार व विषमज्वराचे रुग्णही दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

श्वासांद्वारे एकाकडून दुसऱ्याकडे जंतू संक्रमित
तज्ज्ञाच्या मते, ‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे संक्रमित ताप. या तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा थंड पाणी, आईसक्रिम, कोल्डड्रिंक प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फैलावतो. श्वासांद्वारे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जंतू संक्रमित होत असल्याने एकाच घरात ‘व्हायरल फिव्हर’चे एकपेक्षा जास्त रुग्ण दिसून येतात.

स्वत:हून औषधे घेणे टाळा
‘व्हायरल’ असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु या सोबतच डेंग्यूसदृश लक्षणे असलेले रुग्णही दिसून येत आहे. यामुळे कुठल्याही तापावर स्वत:हून औषधे घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करा. आराम करा. ‘व्हायरल’ रुग्णांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्या. स्वच्छता पाळा. ताजे व घरचे अन्नच घ्या.
-डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ
 

Web Title: Nagpur in grip of 'Viral'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य