राज्याच्या तुलनेत नागपूरचा मृत्यूदर सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:30+5:302021-04-02T04:09:30+5:30
नागपूर : राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे. यात मृत्यूच्या वाढत्या संख्येने ...
नागपूर : राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे. यात मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल रोजी जगाचा मृत्यूदर २.१९ टक्के, भारताचा १.३३ टक्के, महाराष्ट्राचा १.९४ टक्के तर नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वाधिक २.२४ टक्के होता. वाढत्या मृत्यूमागे लक्षणे दिसूनही उशिरा चाचणी व उशिरा उपचार हे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. या महिन्यात दोन रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८, ऑगस्ट महिन्यात ९१९, सप्टेंबर महिन्यात १४०६, ऑक्टोबर महिन्यात ९५२, नोव्हेंबर महिन्यात २६९, डिसेंबर महिन्यात २५८, जानेवारी महिन्यात २२८, फेब्रुवारी महिन्यात १७७ तर मार्च महिन्यात ७६३ रुग्णांचे जीव गेले. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात काही दिवस शहर व ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंदही झाली. परंतु कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना व दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना युद्धस्तरावर हातीच घेण्यात आल्या नाहीत. परिणामी, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मृत्यूचा आकडा वाढताना दिसून येत आहे.
- पहिल्या २४ तासात मृत्यूचे प्रमाण २०.८७ टक्के
मेडिकलमध्ये १ ते २५ मार्च या कालावधीत २३० कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. यात ‘ब्रॉट डेड’चे प्रमाण १६.९६ टक्के तर, पहिल्या २४ तासाच्या उपचारातील मृत्यूचे प्रमाण २०.८७ टक्के आहे. यावरून रुग्ण घरीच गंभीर होत आहेत. त्यांच्यावरील औषधोपचाराकडे प्रशासनाचे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येते.
- ५० वर्षांवर ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्या ७० टक्के रुग्णांचा मृत्यू
वरिष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले,‘को-मॉर्बिडिटीज’ असलेले ५० वर्षांवरील रुग्ण कोरोना होऊनही विशेष लक्ष देत नाही. विशेषत: रुग्णालयात उशिरा येतात. परिणामी, यातील जवळपास ७० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत ही दुसरी लाट अधिक भयावह ठरत आहे. यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे व लक्षणे दिसताच चाचणी करणे व औषधोपचार करणे महत्त्वाचे झाले आहे.
- कोणतीही लक्षणे अंगावर काढू नका
मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, रुग्णालयात मृत्यू होणारे साधारण ६६ टक्के मृत्यू हे पहिल्या तीन दिवसातील तर, ५० टक्के रुग्ण हे पहिल्या २४ तासातील आहेत. यामागे लक्षणे असूनही उशिरा चाचणी, उशिरा उपचार हे मुख्य कारण आहे. कोणतीही लक्षणे अंगावर काढू नका. लक्षणे दिसताच चाचणी करा व अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तातडीने योग्य उपचार घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.