नागपुरात तीन दिवस पाणीपुरवठा नाही : पुन्हा महिनाभर चालणार पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:12 AM2019-07-23T00:12:34+5:302019-07-23T00:14:11+5:30

नवेगाव-खैरी जलाशयाची पातळी अधिकच खालावली आहे. परिणामत: शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कालावधी पुन्हा महिनाभरासाठी वाढविण्यात आला आहे. शहराच्या भागांमध्ये पेंच प्रकल्पातून होणाऱ्या क्षेत्रात २२ ऑगस्टपर्यंत बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही. तर, कन्हान नदीच्या स्रोतावरून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात मात्र पाणीपुरवठा कायम राहणार आहे. या नदीची पाण्याची पातळी सध्या तरी स्थिर असल्याने या स्रोतावरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय नाही.

Nagpur has no water supply for three days: Water shortage will last for a month | नागपुरात तीन दिवस पाणीपुरवठा नाही : पुन्हा महिनाभर चालणार पाणीकपात

नागपुरात तीन दिवस पाणीपुरवठा नाही : पुन्हा महिनाभर चालणार पाणीकपात

Next
ठळक मुद्देबांधकाम, स्विमिंग पुलासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवेगाव-खैरी जलाशयाची पातळी अधिकच खालावली आहे. परिणामत: शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कालावधी पुन्हा महिनाभरासाठी वाढविण्यात आला आहे. शहराच्या भागांमध्ये पेंच प्रकल्पातून होणाऱ्या क्षेत्रात २२ ऑगस्टपर्यंत बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही. तर, कन्हान नदीच्या स्रोतावरून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात मात्र पाणीपुरवठा कायम राहणार आहे. या नदीची पाण्याची पातळी सध्या तरी स्थिर असल्याने या स्रोतावरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय नाही.
मागील आठवड्यामध्ये जलाशयाची पातळी अधिकच खालावली होती. त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागला होता. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी मनपा मुख्यालयात बैठक पार पडली. यात पाणीपुरवठ्यातील कपातीचा निर्णय पुन्हा महिनाभर कायम ठेवण्याचे ठरविण्यात आले. तसेच दर आठवड्यात पाणीकपातीचा आढावा घेण्याचेही ठरले. दरम्यानच्या काळात मान्सून सक्रिय झाला आणि जलाशयांची पातळी वाढली तर निर्णय मागे घेतला जाऊ शकतो.
सोमवारी झालेल्या या बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, पाणीपुरवठा समिती सभापती पिंटू झलके, उपसभापती भगवान मेंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे सीईओ रॉय, संचालक के.एम.पी. सिंग उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना झलके म्हणाले, तलावांमध्ये पाणी नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय पुन्हा महिनाभरासाठी वाढविला आहे. पाणीकपातीमध्ये कसलेही राजकारण व्हायला नको. या संकटासोबत लढण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे येण्याची गरज आहे. मागील आठवड्यात केलेल्या पाणीकपातीमधून १२६० एमएलडी पाणी वाचले आहे. त्यावर अध्ययनही केले जात आहे. पाणीकपात असलेल्या दिवशी जादा दराने टँकरने पाणी पुरविले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पाणीकपातीच्या दिवशी टँकरने पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी चौकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांचा परवाना रद्द केला जाईल.
तीन दिवसात वाचविले १,२६० एमएलडी पाणी
पाणीपुरवठा समितीच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी म्हणाल्या, १५ जुलैला पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. १७ जुलै, १९ जुलै आणि २१ जुलैला पेंचमधून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवला. यातून १,२६० एमएलडी पाणी वाचविता आले. नवेगाव खैरी येथून दररोज ५०० एमएलडीच्या जवळपास पाणी उचलले जाते.
...तर फौजदारी कारवाई करणार
पिंटू झलके म्हणाले, शहरातील स्विमिंग पूल, मैदान आणि बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश बैठकीमध्ये देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा उपयोग करताना कुणी आढळल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल. दुसºया स्रोतामधून पाण्याचा वापर करण्यास मात्र महानगरपालिकेची हरकत नसेल.
शासकीय कार्यालयांना पत्र
शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होतो. अनेक कार्यालयांमध्ये लिकेज आणि अन्य कारणांमुळे पाणी वाया जाते. हे वाया जाणारे पाणी थांबविण्याच्या सूचना शासकीय कार्यालयांना पत्रातून दिल्या आहेत. शहरातील शिक्षण संस्था, मंगल कार्यालये, हॉटेल्स, दवाखाने आदी ठिकाणांवरील नळांची पाहणी केली जाईल. लिकेज आढळल्यास कारवाई केली जाईल.
महापौर बैठकीपासून दूर का?
पाणी पुरवठ्यातील कपातीचा निर्णय शहरवासीयांच्या हितासाठीच आहे. हा निर्णय घेण्यात महापौरांचाही सहभाग महत्त्वाचा होता. तरीही पाणी पुरवठ्यातील कपातीसंदर्भात झालेल्या दोन बैठकांना महापौर उपस्थित नसल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. १५ जुलैला पाणी पुरवठा कपातीची घोषणा माध्यमांसमोर केली जाताना महापौर नंदा जिचकार आपल्या केबिनमध्ये होत्या. सोमवारीही महापौर कक्षात नव्हत्या. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर झलके म्हणाले, पाणी कपातीच्या निर्णयासंदर्भात महापौरांना कल्पना आहे. त्या बैठकीला का उपस्थित नव्हत्या, यावर ते काही बोलू शकले नाही.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  •  शहरातील सर्व मंगल कार्यालये, मोठ्या संस्था, हॉटेल्स, रुग्णालये, कोचिंग क्लासेस, मॉल आदी ठिकाणचे नळ कनेक्शन तपासले जातील.
  •  अवैधपणे टिल्लूपंप वापरणाऱ्यांविरूद्ध पोलिसात तक्रार केली जाईल. संबंधितांच्या नळाचे कनेक्शन तोडले जाईल.
  •  स्विमिंग पूल, मैदान, बांधकामावर पिण्याच्या पाण्याचा वापर नको. असे आढळल्यास कडक कारवाई.
  •  पाणी पुरवठा बंद असलेल्या दिवशी नेटवर्क आणि नॉन नेटवर्क क्षेत्रामध्ये टँकरने पाणी पुरवठा नाही.

Web Title: Nagpur has no water supply for three days: Water shortage will last for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.