मुखाच्या कर्करोगात नागपूरने पुणे, औरंगाबादला टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 08:00 AM2022-05-29T08:00:00+5:302022-05-29T08:00:01+5:30

Nagpur News तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या मुखाच्या कर्करोगात नागपूरने पुणे, औरंगाबादलाही मागे टाकले आहे. नागपुरात एक लाख लोकसंख्येत जवळपास ९१ पुरुष या कर्करोगाला बळी पडत आहेत.

Nagpur has overtaken Pune and Aurangabad in oral cancer | मुखाच्या कर्करोगात नागपूरने पुणे, औरंगाबादला टाकले मागे

मुखाच्या कर्करोगात नागपूरने पुणे, औरंगाबादला टाकले मागे

googlenewsNext
ठळक मुद्देतंबाखूमुळे कॅन्सरचा धोका अधिकएक लाख लोकसंख्येत ९१ पुरुष व ९० महिलांना कर्करोग

नागपूर : तंबाखू आणि सिगारेटच्या नादाला लागलेल्यांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत चालला आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या मुखाच्या कर्करोगात नागपूरने पुणे, औरंगाबादलाही मागे टाकले आहे. नागपुरात एक लाख लोकसंख्येत जवळपास ९१ पुरुष या कर्करोगाला बळी पडत आहेत, तर पुण्यामध्ये ८३, औरंगाबादमध्ये ७० तर उस्मानाबादमध्ये ४० पुरुषांना हा कर्करोग होत आहे.

३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर’ने शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. करतारसिंह म्हणाले, ‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. प्रशांत माथूर यांच्यानुसार २०२१ मध्ये भारतात कर्करोगाचे रुग्ण २ कोटी ६७ लाख होते, २०२५ मध्ये यात सुमारे ३१ लाख नव्या कर्करोगाच्या रुग्णांची भर पडून २ कोटी ९८ लाख होण्याची शक्यता आहे.

-तंबाखूमुळे ५० टक्के पुरुषांमध्ये, २० टक्के महिलांमध्ये कर्करोग

‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नुसार (आयसीएमआर) तंबाखूच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये ५० टक्के तर, महिलांमध्ये २० टक्के‘हेड ॲण्ड नेक’चा कर्करोग होऊ शकतो. तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

-फुफ्फुसाच्या कर्करोगात ५४ टक्के रुग्ण गंभीर

डॉ. करतारसिंह म्हणाले, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ५४ टक्के आणि पोटाच्या कर्करोगाचे २९ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत येतात. सामान्यत: पुरुषांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण ११.१ टक्के, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण ८.४ टक्के, प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण ७ टक्के, महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २९.९ टक्के, गर्भाशयाचा तोंडाचे प्रमाण ११ टक्के, अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ४.३ टक्के आहे.

-महाराष्ट्रात ३१.४ टक्के लोक करतात तंबाखूचा वापर

महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ३१.४ टक्के लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचा वापर करतात. यात ३.४ टक्के लोक धूम्रपान करणारे, २.७ टक्के लोक विडी ओढणारे तर, २७.६ टक्के धूररहित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणारे आहेत.

-तंबाखूविरोधात जनजागृती आवश्यक

डॉ. बी. के. शर्मा म्हणाले, तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता ४० टक्क्यांनी वाढते. यामुळे तंबाखूविरोधात प्रत्येकाचा पुढाकार आवश्यक आहे. हॉस्पिटलच्यावतीने मंगळवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रपरिषदेला कॅन्सर रिलीफ सोसायटीचे अनिल मालविया, अरविंद धवड आदी उपस्थित होते.

Web Title: Nagpur has overtaken Pune and Aurangabad in oral cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.