राज्यात अपहरणाचा सर्वाधिक दर नागपुरात; तीन वर्षांपासून सातत्याने प्रकरणांत वाढ
By योगेश पांडे | Published: September 5, 2022 01:50 PM2022-09-05T13:50:46+5:302022-09-05T14:57:16+5:30
८६ टक्के प्रकरणे सोडविण्यात पोलिसांना यश
नागपूर : ३० लाखांच्या खंडणीसाठी नागपुरातील मुख्याध्यापक प्रदीप मोतीरामानी यांचे अपहरण झाल्यानंतर नागपुरात खळबळ उडाली होती. अपहरणाच्या घटनांसंदर्भात ‘एनसीआरबी’ची आकडेवारी आणखी धक्कादायक आहे. मागील तीन वर्षांपासून नागपुरात अपहरणाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात अपहरणाचा सर्वाधिक दर नागपुरातच होता. परंतु नागपूर पोलिसांना त्यातील ८६ टक्के प्रकरणांत अपहृतांना शोधण्यात यश आले.
अधिकृत आकडेवारीनुसार २०२० साली नागपुरात ३३४ जणांचे अपहरण झाले होते. २०२१ साली हाच आकडा ४१५ वर गेला व नागपुरातील लोकसंख्येच्या तुलनेत अपहरणाच्या गुन्ह्यांचा दर १६.६ इतका होता. मुंबई व पुण्यामध्ये हाच दर ८.६ व ११.३ इतका होता. अपहरणाच्या दराच्या हिशेबाने नागपूरचा देशात सातवा क्रमांक होता.
२०२२ मध्ये सात महिन्यांत महिन्याला ३८ अपहरण
२०२२ मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत नागपुरात अपहरणाच्या २६८ प्रकरणांची नोंद झाली. याची सरासरी काढली असता दर महिन्याला अपहरणाचे ३८ गुन्हे नोंदविल्या गेले. २०२१ मध्ये दर महिन्याला अपहरणाच्या ३४ प्रकरणे नोंदविण्यात आली होती.
पोलिसांकडून ५१७ गुन्ह्यांची उकल
२०२१ मधील प्रलंबित व २०२२ मधील गुन्हे असे मिळून पोलिसांकडे अपहरणाची ५९८ प्रकरणे होती. त्यातील ५१७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. ही टक्केवारी ८६ टक्क्यांहून अधिक आहे. सापडलेल्यांमध्ये ११७ मुले किंवा पुरुष व ४०० मुली किंवा महिला होत्या.
अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक
अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यास पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे पोलीसही अशा गुन्ह्यांच्या तपासाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित मुलांच्या शोधासाठी विशेष प्रयत्न करतात. १८ वर्षांखालील मुलांपेक्षा मुलींसंदर्भात अपहरणाचे गुन्हे सर्वाधिक नोंद होत असल्याची माहिती पुढे आली आहे. वर्षभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची संख्या सर्वाधिक ३३२ इतकी होती.
वय : संख्या (महिला) : संख्या (पुरुष)
सहा वर्षांखालील : १ : १
६ ते १२ वर्ष : ११ : ८
१२ ते १६ वर्ष : ४९ : १४०
१६ ते १८ वर्ष : १७ : १८३
१९ ते ३० वर्ष : ६ : १२
३० ते ६० वर्ष : ३ : ०
६० हून अधिक : १ : ०
शहरनिहाय अपहरणाचा दर
शहर : दर
नागपूर : १६.६
पुणे : ११.३
मुंबई : ८.६