नागपूरच्या  हवालाकांडात एपीआय सोनवणे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:05 AM2018-05-06T01:05:57+5:302018-05-06T01:06:19+5:30

कुख्यात गुन्हेगारांना हाताशी धरून हवालाची अडीच कोटींची रोकड लुटणारा सहायक पोलीस निरीक्षक सुनील नारायण सोनवणे याला शनिवारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी निलंबित केल्याचे जाहीर केले. गेल्या रविवारी, २९ एप्रिलच्या पहाटे झालेल्या या गुन्ह्यामुळे हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. तर, राज्य पोलीस दलालाही यामुळे जबर हादरा बसला होता.

In Nagpur Hawala case API Sonawane Suspended | नागपूरच्या  हवालाकांडात एपीआय सोनवणे निलंबित

नागपूरच्या  हवालाकांडात एपीआय सोनवणे निलंबित

Next
ठळक मुद्देकारमध्ये ५ कोटी ७३ लाख रुपये होते

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुन्हेगारांना हाताशी धरून हवालाची अडीच कोटींची रोकड लुटणारा सहायक पोलीस निरीक्षक सुनील नारायण सोनवणे याला शनिवारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी निलंबित केल्याचे जाहीर केले.
गेल्या रविवारी, २९ एप्रिलच्या पहाटे झालेल्या या गुन्ह्यामुळे हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. तर, राज्य पोलीस दलालाही यामुळे जबर हादरा बसला होता.
छत्तीसगड, रायपूरमधून हवालाची रोकड घेऊन आलेली एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाची डस्टर कार प्रजापती चौकाजवळ नंदनवन पोलिसांनी अडवली होती. कारमधील ५ कोटी, ७३ लाखांपैकी २ कोटी, ५५ लाखांची रोकड पोलिसांचे साथीदार बनून आलेल्या चार गुन्हेगारांनी काढून घेतली. नंतर ही कार नंदनवन ठाण्यात आणून कारमधून ३ कोटी १८ लाखांची रोकड जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
रायपूरहून (छत्तीसगड) मधील मॅपल ज्वेलर्सचे संचालक खजान ठक्कर यांनी ही रोकड नागपुरातील हवाला व्यावसायिक प्रशांत केसानी याच्याकडे पोहचवण्यासाठी पाठवली होती, अशी माहिती त्यावेळी कारचालक राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतिनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ) या दोघांनी दिली होती. दरम्यान, कारमध्ये ५ कोटी ७३ लाख रुपये होते आणि त्यातील २ कोटी ५५ लाखांची रोकड लंपास झाल्याचा आरोप मनीष खंडेलवालने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतून नोंदवला होता. त्यामुळे या प्रकरणाला भलतेच वळण लागले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी या प्रकरणाच्या प्रारंभापासूनच्या घडामोडींची कसून चौकशी केली असता नंदनवन ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे याने त्याच्या मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कुख्यात गुन्हेगार सचिन नारायण पडगिलवार, रवी रमेश माचेवार, गजानन भालेनाथ मुंगणे, आणि प्रकाश बबलू वासनिक यांच्याशी संगनमत करून कारमधील २ कोटी ५४ लाख, ९२ हजार ८०० रुपये लुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नंदनवन ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पडगिलवार, माचेवार, मुंगणे आणि वासनिक या गुन्हेगारांसोबतच सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे, पोलीस कर्मचारी विलास भाऊराव वाडेकर आणि सचिन शिवकरण भजबुजे यांनाही अटक केली. वाडेकर आणि भजबुजेला शुक्रवारी तर, सोनवणेला आज निलंबित करण्यात आले.

Web Title: In Nagpur Hawala case API Sonawane Suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.